लोणावळा – कासारसाई येथील धरणात बुडून आज सकाळी एका 14 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. शिवदुर्ग रेस्क्यू पथकाने शोधमोहीम राबवत दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.
प्रदूम गायकवाड (वय 14, रा.कस्पटे वस्ती,वाकड) असे या मुलाचे नाव आहे. शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी प्रदुम हा कुटुंबातील सदस्यासह कासारसाई धरण परिसरात आला होता. पाण्यात उतरल्यानंतर पाय घसरुन पडल्याने तो बुडाला.
ही माहिती समजल्यानंतर लोणावळ्यात शिवदुर्ग मित्रचे रेस्क्यू पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. त्याठिकाणी स्थानिक नागरिक राजाराम केदारी यांच्यासह शिवदुर्गचे गणेश ढोरे, प्रवीण देशमुख, अजय शेलार, भास्कर माळी, हर्षल चौधरी, रुपेश गराडे याच्या पथकाने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.