Jaykumar Gore – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसनशील नेतृत्वाखाली राज्यातील प्रत्येक गावात विकासपर्व उभे राहिले आहे. शेतकरी, महिला भगिनी, युवक, विद्यार्थी आणि अबालवृध्दांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरु आहेत. समाजातील प्रत्येक घटक भाजपवर विश्वास दाखवत आहे, त्यामुळेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये माण-खटावसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात शत प्रतिशत भाजप असा नारा जनतेनेच दिला आहे. विकासाच्या राजकारण आणि समाजकारणामुळे भाजपचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास ग्रामविकासमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. कातरखटाव, अंबवडे, कुकुडवाड येथील जाहीर सभांमध्ये ते बोलत होते. यावेळी सोनिया गोरे, अरुण गोरे, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.ना. जयकुमार गोरे म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामविकास खात्याअंतर्गत येतात. मायबाप जनतेच्या आशीर्वादाने राज्याचे हे खाते माझ्याकडे आहे. याच खात्याअंतर्गत रस्ते, देवस्थान विकास, पायाभूत सुविधा, जि. प. अंतर्गत आरोग्य सुविधा येत असल्याने आपण माण-खटावसह जिल्ह्याच्या विकासाचा बॅकलॉग भरुन काढत आहोत. आमच्या सरकारने शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केले आहे. मोफत धान्य, शेतकरी सन्मान योजना, लाडकी बहीण योजना सुरु आहे. लवकरच आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत. सातारा जिल्हा परिषद माता भगिनींचा सन्मान वाढवण्याचे काम आमचे सरकार करत आहे.माण-खटावमध्ये नेहमीप्रमाणे माझ्या विरोधात विधानसभा लढलेले अनेकजण एकत्र येवून जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. विकासकामांचा आणि त्यांचा काहीच संबंध नसल्याने सगळेच विरोधक फक्त पैशांची मस्ती दाखवत आहेत. त्यांची जहागिरी आणि घमेंड भाजपचे जनमानसातील सर्वसामान्य आणि जनतेच्या कामाचे उमेदवार निश्चित उतरवणार आहेत. आम्ही प्रत्येक गावात जनतेने सांगितलेली सर्व कामे मार्गी लावून आशीर्वाद मागत आहोत. दुष्काळमुक्ती अंतिम टप्प्यात आणली आहे. उरमोडी, जिहेकठापूरचे पाणी मतदारसंघाला नवसंजीवनी देत आहे. शब्द दिल्याप्रमाणे उत्तर माणमधील ३२ गावांमध्ये सध्या पाणी सुरु आहे. कुकुडवाड, मायणीसह पन्नासहून अधिक गावांसाठी टेंभू योजनेची कामे वेगाने सुरु आहेत. गावोगावी कॉंक्रिट रस्ते, व्यायमशाळा, समाजमंदिरे, ग्रामपंचायत,आरोग्य केंद्र, शाळा, अंगणवाडी इमारती उभ्या रहात आहेत. सर्व देवस्थाने विकसीत होत आहेत. भाजपचा झंजावात इतका मोठा आहे कि विरोधातील अनेकजण आमच्या विकासप्रवाहात सामील होत आहेत. माण-खटाव पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ना. गोरे पुढे म्हणाले, म्हसवड परिसरात एमआयडीसी उभी रहात आहे. शक्तीपीठ महामार्ग आमचे नशीब पालटणार आहे. माझा शेतकरी बागायती शेती करु लागला आहे. माण-खटावची ओळख आता दुष्काळी नव्हे तर विकसित म्हणून होत आहे. इथल्या जनतेला आणि नेत्यांनाही कधी किंमत नव्हती, मात्र आता माण-खटाव पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू झाला आहे. स्वाभिमानी जनतेने माझ्या पाठिशी गेल्या सतरा वर्षांपासून मोठे पाठबळ उभे केल्यानेच मी दिलेला प्रत्येक शब्द पूर्णत्वाला नेत आहे. जनतेच्या आशीर्वादानेच मंत्रीपद मिळाले आहे. त्याच जनतेसाठी अहोरात्र परिश्रम करुन विकसित माण-खटावचे स्वप्न पूर्णत्वाला घेऊन निघालो असल्याचेही ना. गोरे यांनी सांगितले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीही भाजपचीच होणार सातारा जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता येणारच आहे. त्याचबरोबर माण-खटावमधील पंचायत समित्याही भाजपच्याच होणार आहेत. माणमध्ये २७ कोटींची पंचायत समितीची इमारत उभी रहात आहे. मागेल ती विकासकामे देत असल्याने भाजपचे सर्व उमेदवार निवडून द्यायला जनताच सज्ज झाली आहे.