Nitin Gadkari : नितीन गडकरी यांच्याकडून अशोकराव टाव्हरे यांच्या कार्याचे कौतुक; प्रेरणादायी म्हणत दिला गौरवपूर्ण संदेश
Nitin Gadkari : राजकीय आणि विकासात्मक प्रवासाचे पुस्तकातून दर्शन; कवी आणि लेखक अशोकराव टाव्हरे यांच्या साहित्याची दखल घेत गडकरींनी व्यक्त केला विश्वास.

Nitin Gadkari – गेली अनेक वर्षे साहित्य, समाजकार्य आणि पक्षनिष्ठेच्या माध्यमातून अशोकराव टाव्हरे करीत असलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अशोकराव टाव्हरे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या सार्वजनिक जीवनावर आधारित ‘विकासाचा राजमार्ग’ आणि ‘हायवे ऑफ डेव्हलपमेंट’ या पुस्तकांचे लेखन अशोकराव टाव्हरे यांनी केले आहे.
गेल्या सात वर्षांपासून त्यांनी ही पुस्तके शासकीय कार्यालये, ग्रंथालये, शाळा, पदाधिकारी आणि अधिकार्यांना मोफत वितरित करण्याचा उपक्रम सातत्याने राबविला आहे. गडकरी यांचा 27 मे रोजी वाढदिवस असून त्यानिमित्त टाव्हरे पुन्हा मोफत पुस्तक वाटप मोहीम राबवत आहेत. या उपक्रमाबद्दल नितीन गडकरी यांनी टाव्हरे यांना लेखी पत्र पाठवून कौतुक केले असून, हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
अशोकराव टाव्हरे यांनी नितीन गडकरी यांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, विधानपरिषद सदस्य, विरोधी पक्षनेते ते केंद्रीय मंत्री असा राजकीय आणि विकासात्मक प्रवास आपल्या पुस्तकांतून उलगडला आहे. ही पुस्तके मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आली आहेत. कवी, लेखक आणि संपादक म्हणून अशोकराव टाव्हरे यांची आतापर्यंत दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
तसेच पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलनाचे सलग तीन वर्षे आयोजन त्यांनी केले आहे. गेली 26 वर्षे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख असून विविध सामाजिक प्रश्नांवर ते सातत्याने कार्यरत आहेत.





