प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून शहरात १०० नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे, तर सुमारे ४० ते ४५ नावांबाबत कोअर कमिटीत एकमत न झाल्याने या नावांची यादी अंतिम निर्णय घेण्यासाठी प्रदेश कमिटीकडे पाठविण्यात येणार आहेत.शहरातील कोअर कमिटीने मान्यता दिलेली पहिली यादी गुरुवारी प्रदेश कार्यालयाकडे दिली जाणार असून, शुक्रवारी (दि. २६) ही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पक्षाकडून बुधवारी दिवसभर विधानसभानिहाय या नावांवर पक्षाच्या आमदारांसोबत चर्चा करण्यात आली. त्यात काही नावे पक्षाच्या आमदारांकडून देण्यात आली असून, काही नावे शहर पदाधिकाऱ्यांनी दिली आहेत. त्यातून १०० जागांवरील नावे अंतिम करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.महापालिकेवर पुन्हा एकहाती सत्ता मिळविण्यासाठी भाजपकडून नियोजन सुरू आहे. त्यासाठी पुण्यात १२० जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. ज्या प्रभागांमध्ये भाजपकडे सक्षम उमेदवार नाहीत; अथवा माजी नगरसेवकांचे काम समाधानकारक नाही, अशा ठिकाणी उमेदवार बदलण्यात येणार आहेत. काही प्रभागांसाठी इतर पक्षांतील माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. त्यानंतर आता उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत जवळ येत असल्याने पक्षाकडून उमेदवार अंतिम करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी बुधवारी आपटे रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, महापालिका निवडणूक प्रमुख गणेश बिडकर, राजेश पांडे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले उपस्थित होते. या बैठकीत विधानसभानिहाय प्रभागांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि स्थानिक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रभागनिहाय उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. ज्या नावांवर एकमत झाले, त्यावर शिक्कामोर्तब करून यादी तयार करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांच्या नावांवर एकमत झालेले नाही, त्याबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी प्रदेश पातळीवरील नेत्यांकडे सोपविण्यात आली आहे.