Koregaon Bhima News – पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीत अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या झेडपी सदस्यांचा हिरमोड झाला आहे. अध्यक्षपद नाही, किमान सभापतिपद तरी द्या, अशी मागणी शिरूर तालुक्यातील जनतेमधून जोर धरू लागली आहे. दरम्यान, या निवडीत शिरूर तालुक्याकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. (स्व) नेते बाप्पूसाहेब थिटे यांच्यानंतर तब्बल ४८ वर्षांनी शिरूर तालुक्याला पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळेल, अशी आस लागली होती. परंतु ही आशा मावळून गेली. अनेक वर्षांपासून शिरूर तालुक्याला जिल्हा परिषदेमधील प्रमुख पदांपासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे यंदा शिरूर तालुक्याला न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेषतः स्थानिक पातळीवर सक्षम नेतृत्व, मोठे मताधिक्य, संघटनशक्ती असूनही शिरूरला योग्य प्रतिनिधित्व मिळत नसल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये जोर धरू लागली आहे. gramin vote पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिरूर तालुक्यातील उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. त्यामुळे तालुक्याचा राजकीय प्रभाव वाढलेला असतानाही सभापती निवडीत डावलले जात असल्याची खंत कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. ‘आम्ही मतदान करून नेतृत्व घडवतो, मात्र, सत्तावाटपात आमच्या शिरूर तालुक्याला कायम दुय्यम स्थान दिले जाते’, असा नाराजीचा सूर अनेक राजकीय नेत्यांनी आळवला आहे. जिल्हा परिषदेत केंदूर- पाबळ जिल्हा परिषद गटातून प्रफुल्ल शिवले यांनी पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम केला आहे. शिवले यांना अध्यक्षपद नाही तर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थानिक प्रश्नांना योग्य न्याय मिळण्यासाठी किमान सभापती पद देणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, वरिष्ठ नेत्यांनी शिरूर तालुक्याच्या भावना लक्षात घेऊन गुरुवार (दि.२) सभापतीनिवडीत योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सभापतिपदाच्या निवडीकडे तालुक्याला न्याय मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शिरूर तालुक्याला आस ! जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत दौंड तालुक्यातून वीरधवल जगदाळे, आंबेगाव तालुक्यातून विवेक वळसे पाटील यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे सभापती पदाच्या निवडीत शिरूरचा दावा भक्कम मानला जात आहे. त्यामुळे या होणाऱ्या निवडीत शिरूर, मावळ, बारामती, इंदापूर तालुक्यातील प्रबळ उमेदवारांचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे. या निवडीकडे आमदार माऊली कटके, माजी आमदार अशोक पवार यांच्या रणनितीवर संधीची दारे खुली होणार असल्याची चर्चा सुरू आहे.