Shirur News : शिरूरमध्ये ‘दामिनी पथक’ कार्यान्वित करण्याची मागणी; आयेशा सय्यद यांचे पोलीस प्रशासनाला निवेदन
शिरूर शहरातील महिला व विद्यार्थिनींच्या वाढत्या सुरक्षेच्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर शिरूरमध्ये विशेष ‘दामिनी पथक’ तातडीने कार्यान्वित करावे.

Shirur News – शिरूर शहरातील महिला व विद्यार्थिनींच्या वाढत्या सुरक्षेच्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर शिरूरमध्ये विशेष ‘दामिनी पथक’ तातडीने कार्यान्वित करावे, अशी मागणी शिरूर नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आयेशा कलीम सय्यद यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन शिरूर पोलीस निरीक्षक संदीप केंजळे यांना देण्यात आले.
शहरातील शाळा व महाविद्यालये १४ जूनपासून सुरू झाली असून, दररोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनींची ये-जा वाढली आहे. विशेषतः शाळा, महाविद्यालय परिसर, बसस्थानके, मुख्य रस्ते तसेच बाजारपेठ भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही ठिकाणी रोडरोमिओंचा वावर, छेडछाड, गैरवर्तन तसेच महिलांना असुरक्षित वाटत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पुढे येत आहेत.
यामुळे शहरातील संवेदनशील व गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र ‘दामिनी पथक’ नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. हे पथक शाळा, महाविद्यालय परिसर, बसस्थानके, बाजारपेठ तसेच मुख्य चौकांमध्ये नियमित गस्त घालून महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
महिलांवरील अत्याचार, छेडछाड व गैरप्रकारांना आळा बसण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शहरातील नागरिक, पालक व विद्यार्थिनींकडून या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, लवकरात लवकर दामिनी पथक कार्यान्वित करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





