प्रभात वृत्तसेवा पुणे – खोटे दिव्यांग प्रमाणपणाद्वारे भारतीय प्रशासन सेवेते (आयएएस) नोकरी मिळवल्याचा आरोप असलेल्या पूजा खेडकर यांच्या औंधमधील बंगल्यात मध्यरात्री धक्कादायक जबरी चोरी झाली असून यात खेडकर कुटुंबातील सदस्यांसह सातजण बेशुद्धावस्थेत आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. अधिकार नसतानाही वाहनावर लाल दिवा लावण्यावरून प्रकाशझोतात आलेल्या पूजा खेडकर यांच्या घरातील चोरीबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ११ जानेवारी रोजी रात्री दीड वाजता औंधमधील नॅशनल हाऊसिंग सोसायटीत, सकाळनगर येथील बंगला क्रमांक ११२ येथे चोरी झाल्याची माहिती चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याला दूरध्वनीद्वारे मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता पूजा खेडकर तसेच त्यांचे दोन चुलत भाऊ विनय बुधवंत आणि हर्षद बुधवंत तेथे उपस्थित होते. बंगल्याच्या पार्किंग परिसरात वॉचमन जितेंद्र सिंग बेशुद्ध अवस्थेत आढळला. पुढील तपासात पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांच्या खोलीत दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर हे दोघेही पलंगावर बेशुद्ध अवस्थेत आढळले. बंगल्यातील लाकडी कपाटे फोडण्यात आली असून आतील साहित्य अस्ताव्यस्त पसरलेले होते. तसेच इतर तीन खोल्यांमधील कपाटांतील सामानही विस्कळीत अवस्थेत आढळल्याने मोठी चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.तळमजल्यावरील एका खोलीत वाहन चालक दादासाहेब ढाकणे तर बंगल्याच्या बाहेरील खोलीत कुक सुजित रॉय हेही बेशुद्ध अवस्थेत सापडले. सर्व बेशुद्ध व्यक्तींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.पूजा खेडकर यांच्या माहितीनुसार, घरातील एक नोकर, जो अवघ्या आठ दिवसांपूर्वी नेपाळहून कामावर आला होता, त्याने गुंगीचे औषध देऊन दिलीप व मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध केले. तसेच पूजा खेडकर यांना दोरीने बांधून घरातील मोबाईल व इतर साहित्य घेऊन तो पसार झाल्याचा संशय आहे. दरम्यान, या प्रकरणी तक्रार दाखल करण्याबाबत विचारले असता, आई-वडिलांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर तक्रार दाखल करू, असे पूजा यांनी पोलिसांना सांगितले आहे. सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याने या घटनेबाबत विविध तर्क-वितर्क केले जात आहेत. या घटनेमुळे औंध परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चतु:श्रृंगी पोलीस तपास करत आहेत.