Six Crore Fraud : क्रुड ऑईल गुंतवणुकीच्या नावाखाली ६ कोटींची फसवणूक; बाणेर पोलिसात गुन्हा दाखल
Six Crore Fraud : क्रुड ऑईल व्यवसायात गुंतवणुकीचे मोठे आमिष; बाणेर पोलिस ठाण्यात बहिण-भावासह दिल्ली आणि पंजाबच्या आरोपींवर गुन्हा दाखल.

Six Crore Fraud – क्रुड ऑईल कंपनीत गुंतवणूक केल्यास दोन महिन्यांत ४३ कोटी रुपयांचा फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ६ कोटींची फसवणूक झाली असून चारजणांविरोधात बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कालिदास तुकाराम गुजर ( ४५, रा. भूमकर चौक, वाकड) यांच्या फिर्यादीनुसार पुनम महादेव शेळके, विनायक महादेव शेळके (दोघे रा. आंबेगाव), इंद्रजित सिंग उप्पल (रा. लुधियाना, पंजाब) आणि सौरभ चक्रवर्ती (रा. दिल्ली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना ९ मे २०२५ ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी आर्यन सिक्युरिटीज कंपनीमध्ये पर्यवेक्षक आहेत. शेखर, सोनल गोरे कंपनीचे संचालक असून विशाल माने व्यवस्थापक आहेत. आरोपी पुनम, विनायक शेळके हे गोरे आणि माने यांचे नातेवाईक असल्याने त्यांची कंपनीत ये-जा होती.आरोपींनी क्रुड ऑईलचा मोठा व्यवसाय असून त्यामध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळतो, असे सांगितले. (Six Crore Fraud)
आरोपींवर विश्वास ठेवून कंपनीच्यावतनी २ कोटी ९४ लाख ८४ हजार रुपयांची गुंतवणूक केली. नंतर वारंवार मागणी करूनही आरोपींनी पैसे परत केले नाहीत. यानंतर पुनम, विनायक यांनी सौरभ व इंद्रजित यांना कंपनीत आणले. त्यांच्या व्हिजर ॲरिक्स कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास दोन महिन्यांत ४३ कोटी रुपयांचा नफा मिळेल, असे सांगितले.
त्यावर विश्वास ठेवून आर्यन सिक्युरिटीज कंपनीच्यावतीने पुन्हा २ कोटी ८४ लाख ८४ हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, ही रक्कमही परत केल्याने फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.




