पुणे : बरखास्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा यांना शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात सत्र न्यायाधीश अजित मरे यांनी ५० हजाराचा जामीन मंजुर केला आहे. या गुन्ह्याचा तपास पूर्ण होईपर्यंत, तपास अधिकाऱ्याने नोटीस दिल्याशिवाय पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश करू नये, तक्रारदार व साक्षीदारांशी संपर्क करून नये, या व अशा अटींवर हा निकाल दिला.
दरम्यान सत्र न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे मूळ फिर्यादीचे वकील ॲड. अमेय बलकवडे यांनी सांगितले. मुळशी तालुक्यातील धाडवली गावातील जागेच्या वादातून मनोरमा यांनी शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोप करणारा व्हिडिओ ‘व्हायरल’ झाला.
या प्रकरणात मनोरमासह तिचा पती दिलीप खेडकर, अंबादास खेडकर व दोन पुरुष व दोन महिला बाउन्सरविरोधात शेतकऱ्याला मारहाण, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पौड पोलिसात गुन्हा दाखल आहे. त्यांच्याविरोधात पंढरीनाथ कोंडिबा पासलकर (वय ६५, रा. केडगाव, दौंड) या शेतकऱ्याने तक्रार दिली आहे. या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या मनोरमातर्फे ॲड. सुधीर शहा यांनी जामिनासाठी अर्ज केला.