Run Out Video : शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी हवी होती एक धाव, अन् फलंदाज धावताना पडला, पाहा VIDEO

Zak Chappell run out video viral : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या स्थानिक एकदिवसीय स्पर्धेत 20 ऑगस्ट रोजी लेस्टरशायर आणि डर्बीशायर यांच्यातील सामना थरारक पद्धतीने बरोबरीत सुटला. या सामन्यात लेस्टरशायरने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 गडी गमावून 312 धावा केल्या. प्रत्युत्तरात डर्बीशायरने 49.5 षटकांत 312 धावांपर्यंत मजल मारली, परंतु शेवटच्या चेंडूवर विजयासाठी आवश्यक एक धाव घेण्याच्या प्रयत्नात जॅक चॅपेल विचित्र पद्धतीने रनआउट झाला, ज्यामुळे सामना टाय झाला.
जॅक चॅपेलच्या हातातून बॅट निसटली अन् पिचवर पडला –
डर्बीशायरला शेवटच्या षटकात विजयासाठी 14 धावांची आवश्यकता होती. जॅक चॅपेलने पहिल्या तीन चेंडूंवर 12 धावा काढल्या. त्यानंतर एक वाइड चेंडू झाल्याने स्कोअर बरोबरीत आला. लेस्टरशायरचा गोलंदाज टॉम स्क्रिव्हन याने चौथ्या आणि पाचव्या चेंडूंवर एकही धाव दिली नाही. शेवटच्या चेंडूवर डर्बीशायरला विजयासाठी एक धाव हवी होती. जॅक चॅपेलने लेग साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू त्याच्या थाय पॅडला लागून तिथेच थांबला. याचवेळी नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला असलेला रॉरी हेडन धाव घेण्यासाठी पुढे सरसावला.
Scores are level, 1 ball left.
METRO BANK. pic.twitter.com/DhMegbSswB
— sibo (@SiboAyit) August 20, 2025
जॅक चॅपेलनेही दुसऱ्या टोकाकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळी त्याच्या हातातून बॅट निसटली आणि तो पुढे पडला. स्वतःला सावरण्याच्या प्रयत्नात चॅपेल पिचवर कोसळला. याचवेळी लेस्टरशायरचा यष्टिरक्षक जॉर्डन कॉक्सने चेंडू दुसऱ्या टोकावर फेकला, आणि चॅपेल रनआउट झाला. यामुळे डर्बीशायरला विजयाची संधी हुकली आणि सामना बरोबरीत सुटला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
गुणतक्त्यातील दोन्ही संघांची स्थिती –
या सामन्याच्या बरोबरीनंतर लेस्टरशायर आणि डर्बीशायर यांना प्रत्येकी 2 गुण मिळाले. सध्या ग्रुप-ए मध्ये लेस्टरशायर 10 गुणांसह सातव्या, तर डर्बीशायर 12 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. लेस्टरशायरला ग्रुप-ए मध्ये आणखी 2 सामने खेळायचे आहेत, तर डर्बीशायरला 3 सामने खेळायचे बाकी आहेत. या सामन्यांमधील कामगिरी दोन्ही संघांच्या पुढील प्रवासासाठी महत्त्वाची ठरेल.
थरारक सामन्याने चाहत्यांचे केले निखळ मनोरंजन –
या सामन्याने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात जॅक चॅपेलच्या रनआउटने सर्वांचे लक्ष वेधले. आगामी सामन्यांमध्ये दोन्ही संघ कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





