Asia Cup 2025 : क्रीडा मंत्रालयाने IND vs PAK सामन्याबाबत घेतला मोठा निर्णय! हायव्होल्टेज लढत होणार की नाही? जाणून घ्या

Sports Ministry Green Signal for IND vs PAK match in Asia Cup 2025 : आगामी आशिया कप 9 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी क्रीडा मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यान कोणतीही द्विपक्षीय (बायलॅटरल) क्रीडा मालिका खेळवली जाणार नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, बहुपक्षीय (मल्टी-टीम) स्पर्धांमध्ये भारताला सहभागी होण्यास कोणतीही बंदी घालण्यात येणार नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना 14 सप्टेंबरला आशिया कपमध्ये होणार आहे.
क्रीडा मंत्रालयाचे नवे धोरण जाहीर –
क्रीडा मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय स्पर्धांसंदर्भात नवे धोरण जाहीर केले आहे, ज्यामध्ये पाकिस्तानसोबतच्या क्रीडा संबंधांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सूत्रांनुसार, हे धोरण तात्काळ प्रभावाने लागू झाले आहे. या धोरणात असे नमूद करण्यात आले आहे की, भारताचे पाकिस्तानसोबतचे क्रीडा संबंध हे त्या देशासोबतच्या एकूणच धोरणाला प्रतिबिंबित करतात. द्विपक्षीय क्रीडा स्पर्धांसंदर्भात, भारताचे कोणतेही क्रीडा संघ पाकिस्तानात स्पर्धांसाठी जाणार नाहीत आणि पाकिस्तानच्या संघांना भारतात खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही. मात्र, बहुपक्षीय स्पर्धांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.
आशिया कपला परवानगी, पण द्विपक्षीय मालिकांना बंदी –
क्रीडा मंत्रालयाच्या सूत्राने सांगितले की, “आम्ही भारतीय क्रिकेट संघाला आशिया कपमध्ये सहभागी होण्यापासून रोखणार नाही, कारण ही बहुपक्षीय स्पर्धा आहे. परंतु, द्विपक्षीय मालिकेसाठी पाकिस्तानच्या संघांना भारतीय भूमीवर येण्याची परवानगी दिली जाणार नाही. तरीही, बहुपक्षीय स्पर्धांमध्ये त्यांना खेळण्यापासून आम्ही रोखणार नाही, कारण आम्ही ऑलिम्पिक सनदेचे (Olympic Charter) पालन करतो.” सूत्राने पुढे म्हटले, “आम्ही स्पर्धांमध्ये खेळलो नाही तर त्याचा फायदा पाकिस्तानलाच होईल. आम्हाला त्यांचा पराभव करायचा आहे, मग तो सीमेवर असो वा खेळाच्या मैदानावर.”
हेही वाचा – Bronco Test : भारतीय क्रिकेटपटूंसाठी आता ब्रोंको चाचणी अनिवार्य; काय आहे ती आणि का लागू केली? जाणून घ्या
पाकिस्तानात खेळण्याबाबत साशंकता –
पाकिस्तानात बहुपक्षीय स्पर्धांसाठी भारतीय संघ पाठवायचे की नाही, याबाबत विचारले असता सूत्राने सांगितले, “अशा परिस्थितीत आम्ही त्या वेळी निर्णय घेऊ की संघ पाठवायचा की नाही. ज्या देशाचा मंत्री म्हणतो की त्यांचा ट्रक दगडांनी भरलेला आहे आणि भारत मर्सिडीज आहे, तिथे टक्कर झाल्यास नुकसान कोणाचे होईल, अशा देशात आम्ही आमच्या खेळाडूंना कसे पाठवू शकतो?”





