One-Day Cup 2024 : ‘या’ भारतीय गोलंदाजाने पदार्पणाच्या सामन्यातच घेतले 5 बळी; संघाला स्वबळावर मिळवून दिला विजय…

Yuzvendra Chahal takes 5 in debut for Northamptonshire : युझवेंद्र चहलला अद्याप भारतीय कसोटी संघात संधी मिळालेली नाही. यानंतर त्याने इंग्लंडच्या काउंटी क्लब नॉर्थम्प्टनशायरकडून खेळण्याचा निर्णय घेतला. मग त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी केली आणि पाच विकेट्स घेतल्या. चहलच्या दमदार कामगिरीमुळे त्याच्या नॉर्थम्प्टनशायर संघाने केंट स्पिटफायर्सवर 9 गडी राखून विजय मिळवला आहे. विशेष बाब म्हणजे चहल नॉर्थम्प्टनशायरमध्ये सामील झाल्याची बातमी सामन्याच्या एक तास आधी आली होती.
संघाला मिळवून दिला मोसमातील पहिला विजय…
सुपरस्टार फिरकीपटू युझवेंद्र चहलने 10 षटकांत 14 धावांत 5 विकेट्स केंट स्पिटफायर्सच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. त्यामुळे 35.1 षटकांत विरोधी संघाला सर्व बाद केवळ 82 धावसंख्येपर्यत मजल मारता आली. चहलने जदिन डेन्ली (22), एकांश सिंग (10), ग्रँट स्टीवर्ट (01), बेअर्स स्वानेपोएल (01) आणि नॅथन गिलख्रिस्ट (06) यांचे बळी घेतले. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या संघाने 14 षटकांत एक गडी गमावून 86 धावा करत सहज विजयाची नोंद केली. याआधी ते सहा सामने हरले होते. त्यांचा हा दुसरा विजय आहे. संघ गुणतालिकेत संघ आठव्या स्थानावर असून उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे.
10 overs.
5 maidens.
14 runs.
5 wickets.Take a bow, @yuzi_chahal 👏 pic.twitter.com/LDuDVzhNvy
— Northamptonshire Steelbacks (@NorthantsCCC) August 14, 2024
वनडे कप व्यतिरिक्त युझवेंद्र चहल ‘कौंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन टू’ मध्ये उर्वरित पाच सामनेही खेळणार आहे. नॉर्थम्प्टनशायरने आपल्या वेबसाइटवर चहलच्या संघात सामील झाल्याची घोषणा केली होती. नॉर्थहॅम्प्टनशायरने एका निवेदनात म्हटले आहे की, नॉर्थहॅम्प्टनशायर काउंटी क्रिकेट क्लबला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल केंटमधील अंतिम वनडे कप सामन्यासाठी आणि उर्वरित पाच काउंटी चॅम्पियनशिप सामन्यांसाठी क्लबमध्ये सामील होईल.
चहलच्या नावावर सर्वात जास्त टी20 विकेट
चौतीस वर्षीय युजवेंद्र चहलने आतापर्यंत भारतासाठी 72 वनडे आणि 80 टी-20 सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये तो भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याच्या नावावर 96 विकेट आहेत. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 121 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला अद्याप कसोटी संघात पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही.





