‘मुख्यमंत्री साहेब…..’; ST प्रवर्गातून बंजारा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी तरुणानं संपवलं जीवन

धाराशिव – बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील मुरूम गावातील 32 वर्षीय तरुण पवन गोपीचंद चव्हाण याने आत्महत्या केली. शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास नाईक नगर येथील राहत्या घरी त्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. मयताच्या खिशात सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये बंजारा समाजाला आरक्षण मिळावे, असा आशय होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पवन चव्हाण हा लातूर येथील शाहू कॉलेजमधून बी.कॉम. पदवीधर होता. मात्र, बेरोजगारीमुळे तो हतबल झाला होता. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. पवनने जिंतूर येथे गोर सेना अध्यक्ष संदेश पवार यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या बंजारा आरक्षण आंदोलनात दोन दिवस सहभाग घेतला होता. शुक्रवारी तो नाईक नगर येथे परतला. शनिवारी सकाळी पुन्हा आंदोलनासाठी जिंतूरला जाण्याच्या तयारीत असताना त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
सुसाइड नोटमधून मागणी स्पष्ट-
पोलिसांना घटनास्थळी धाव घेतल्यानंतर मयताच्या खिशात एक चिठ्ठी आढळली. या चिठ्ठीत पवनने हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी मागणी नमूद केली होती. मुरूम पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संदीपान दहिफळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पवनच्या नातेवाइकांनी त्याने बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा दावा केला आहे.
जालन्यात 15 सप्टेंबरला महामोर्चा
बंजारा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी जालना येथे 15 सप्टेंबर रोजी बंजारा कृती समितीच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सरकारच्या 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये आहे, याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. शनिवारी जालना येथे झालेल्या बंजारा कृती समितीच्या बैठकीत मोर्चाचे नियोजन करण्यात आले. आदिवासींच्या विद्यमान आरक्षणाला धक्का न लावता, मूळ टक्केवारीतच बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी समितीने केली आहे.
आंदोलनाची पार्श्वभूमी-
हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमातींच्या यादीत असूनही, त्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नसल्याने समाजात असंतोष आहे. मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर बंजारा समाजानेही याच गॅझेटच्या आधारे आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. पवन चव्हाणसारख्या तरुणांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. त्याच्या आत्महत्येने या मागणीला आणखी तीव्रता आली आहे.
या घटनेमुळे बंजारा समाजातील तरुणांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून, सरकारने तातडीने मागणीचा विचार करावा, अशी मागणी होत आहे.




