Ajit Pawar : आरक्षणावरून छगन भुजबळांचा आक्रमक पवित्रा; अजित पवारांनी एकाच वाक्यात दिलं उत्तर, कुर्डू प्रकरणावर म्हणाले…

Ajit Pawar : राज्य सरकाराने मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरमुळे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवली आहे. सरकारने आम्हाला विश्वासात न घेता मराठा कुणबीचा जीआर काढला असल्याचं भुजबळ म्हणाले आहेत. तसेच त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला आहे. छगन भुजळांची नाराजीवर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे रत्नागिरी दौऱ्यावर आले असताना पत्रकारांनी विविध मुद्यावर प्रश्न विचारले. यामध्ये मराठा आरक्षणसंदर्भात बोलताना कोणावरही अन्याय केला जाणार नाही, कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही याची काळजी सरकार घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मराठा आरक्षणाच्या जीआरवरुन छगन भुजबळ नाराज आहेत का, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले आम्ही जे सरकार चालवतोय त्यामध्ये कुठल्याही घटकाला नाराज करायचं नाही, अशी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली.
कुर्डू प्रकणावर अजित पवार काय म्हणाले?
गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू हे गाव चांगलेचं चर्चेत आहे. आयपीएस पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यासोबत अजित पवार यांचा फोनवरून संवाद झाला होता. या संवादात त्यांनी वापरलेली भाषा अरे तुरेची होती असा आरोप करण्यात येत आहे. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, मला कुर्डूतील व्हायरल व्हिडिओबद्दल त्याबद्दल जे ट्विट करायचे ते केले आहे, कायद्याने नियमांच्या गोष्टी करायच्या असतील तर करण्याची प्रत्येकाला मुभा आहे, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे.
आता त्यांच्या घरी जाऊन आम्ही भेट घेणार
नुकतेच देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सीपी राधाकृष्णन यांनी शपथ घेतली. या शपथविधी समारंभाला एनडीतील अनेक प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली होती. या समारंभाला अजित पवारांची अनुस्थतीमुळे चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देत अजितदादांचा नियोजित दौरा होता म्हणून ते उपस्थित राहू शकले नाहीत, असं सांगितंल होतं. आता यावर बोलताना अजित पवारांनी आता त्यांच्या घरी जाऊन आम्ही भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर परवा दिवशी माझी तब्येत बरी नव्हती, असं शपथविधी सोहळ्याच्या अनुपस्थितीबाबत बोलताना अजित पवारांनी म्हणाले.





