Mumbai News : समुद्रात उडी मारून तरुणाची आत्महत्या; ‘कोस्टल रोड-सिलिंक’वर पहिल्या आत्महत्येची नोंद

मुंबई : कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवरून उडी मारून तरूणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दर्शित राजूभाई सेठ (वय 30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शित हा त्याची आई आणि बहिणीसोबत मालाडमध्ये राहायचा. तो विवाहीत होता. वांद्रे येथील बीकेसीमधील खाजगी कंपनीत कामाला होता. मंगळवारी सकाळी तो हुंडाई कारमधून कामाला गेला आणि कामानिमित्त वरळी सी लिंकवर गेला. तेथून तो कोस्टल रोडवर गेला होता. तिथे कार पार्किंग केल्यानंतर त्याने समुद्रात उडी घेतली.
पावणेआठ वाजता उडी घेतल्यानंतर काही वेळात तिथे वरळी पोलिसांनी धाव घेतली. नेव्हीसह फायर बिग्रेड आणि स्थानिक पोलिसांनी शोधमोहीम घेतली, मात्र अंधारामुळे त्याचा शोध लागला नव्हता. बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह वरळी पोलिसांना सापडला. त्याच्या कारमधील कागदपत्रासह मोबाईलमुळे त्याची ओळख पटली. ही माहिती नंतर त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली. दर्शितकडे सुसाईड नोट सापडली नाही. त्यामुळे त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्याच्या आई, बहिणीसह पत्नीचा जबाब आता नोंदविण्यात येणार असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
कोस्टलवर पहिल्या आत्महत्येची नोंद
दरम्यान, कोस्टल रोडवरुन समुद्रात उडी घेऊन दर्शित राजभाई शेठ या व्यक्तीने मंगळवारी आत्महत्या केली आणि नव्याने बांधलेल्या कोस्टलवर पहिल्या आत्महत्येची नोंद झाली. बुधवारी सागरी सेतू परिसरात त्याचा मृतदेह सापडला आहे. चार महिन्यापूर्वीच त्याचे लग्न झाल्याची माहिती मिळत आहे.





