हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथील युवकाने मेहनत व चिकाटीच्या जोरावर थेट भारतीय अंतराळ संस्था ‘इस्रो’पर्यंत’ झेप घेऊन गावासह तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे. शालेय जीवनात पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाल्याचे शास्त्रज्ञ योगेश सांगळे यांनी डिजिटल प्रभात शी बोलताना सांगितले. कळमनुरी येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले गोजेगाव येथील सोपान सांगळे यांचा मुलगा योगेश सांगळे याने आई वडिलांनी उराशी बांधलेल्या स्वप्नापेक्षा उंच भरारी घेत थेट भारतीय अंतराळ संस्थेची निवड परीक्षा उत्तीर्ण करून वैज्ञानिक इंजिनिअर पदापर्यंत मजल मारली. इस्रोमध्ये निवडला जाणारा औंढा तालुक्यातील पहिला व हिंगोली जिल्ह्यातील तो दुसरा विद्यार्थी आहे. योगेशचे माध्यमिक शिक्षण हिंगोली येथील माणिक स्मारक विद्यालय व शिक्षण आदर्श महाविद्यालयीन महाविद्यालयात पूर्ण झाले. त्यानंतर आळंदी (पुणे) येथील एमआयटी महाविद्यालयात त्याने मेकॅनिकल अभियांत्रिकीचे पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून भारतीय अंतराळ संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या गेट परीक्षेत भारतातून 33 वे स्थान प्राप्त केले. मुलाखतीनंतर योगेश सांगळे यांची ‘इस्रो’मध्ये वैज्ञानिक अभियंता म्हणून नुकतीच निवड करण्यात आली, तसेच सध्या आयआयटी’मध्ये ‘एमटेक’चे शिक्षण घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. ग्रामीण भागातील सर्वसाधारण कुटुंबातील मुलाची भारतीय अंतराळ संस्था ‘इस्रो’मध्ये वैज्ञानिकपदी झालेली निवड इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी असून, त्याच्या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आई-वडिलांचे भक्कम पाठबळ व सातत्यपूर्ण अभ्यासाने केलेली मेहनत सफल झाली. त्यामुळे मी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या वैज्ञानिक अभियंता पदावर रुजू होत आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवला पाहिजे. अपयश आल्याने खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने अभ्यासाला लागावे. जिद्द आणि परिश्रम केव्हाही वाया जात नाहीत. एक ना एक दिवस नक्की यश मिळते. योगेश सांगळे, शास्त्रज्ञ गोजेगाव