Year Ender 2025 India Cricket Golden Year : भारतीय क्रिकेटसाठी २०२५ हे वर्ष केवळ विजयांचे नाही, तर जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवल्याचे ऐतिहासिक पर्व ठरले आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया कप, महिला एकदिवसीय विश्वचषक आणि आयपीएलमधील आरसीबीचे पहिले जेतेपद अशा चार मोठ्या विजयांनी या वर्षाला ‘सुवर्णवर्ष’ म्हणून इतिहासात अजरामर केले आहे. १. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी: १२ वर्षांचा दुष्काळ संपला दुबईमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत तब्बल १२ वर्षांनंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. न्यूझीलंडने ठेवलेल्या २५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने आपल्या अनुभवाची चुणूक दाखवत दिमाखदार अर्धशतक झळकावले. मधल्या फळीने दाखवलेल्या संयमामुळे ४९ व्या षटकात भारताने हे लक्ष्य गाठले आणि संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य राहण्याचा विक्रम केला. २. आशिया कप २०२५: नवव्या जेतेपदासह पाकिस्तानवर मात नेहमीप्रमाणेच हाय-व्होल्टेज ठरलेल्या आशिया कपच्या फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला धुळ चारली. पाकिस्तानने दिलेल्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना युवा फलंदाज तिलक वर्मा याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक साकारली. पाच गडी राखून मिळवलेल्या या विजयामुळे भारताने नवव्यांदा आशिया चषक जिंकून आशियाई खंडातील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. हेही वाचा – Suryakumar Yadav : टी-२० विश्वचषकापूर्वी सूर्या पत्नीसह तिरुपती चरणी; खराब फॉर्ममधून सावरण्यासाठी साकडं, पाहा VIDEO ३. महिला वनडे वर्ल्डकप: ऐतिहासिक पहिल्या विश्वचषकावर शिक्कामोर्तब २०२५ हे वर्ष महिला क्रिकेटमध्ये क्रांती घडवणारे ठरले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून आपला पहिला-वहिला ‘आयसीसी महिला विश्वचषक’ जिंकला. शिस्तबद्ध गोलंदाजी आणि आत्मविश्वासपूर्ण फलंदाजीच्या जोरावर महिला ब्रिगेडने कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न पूर्ण केले. हा विजय देशातील महिला खेळांच्या सन्मानासाठी मैलाचा दगड ठरला आहे. हेही वाचा – Damien Martyn : धक्कादायक! २००३ च्या विश्वचषकाचा हिरो व्हेंटिलेटरवर; मेंदूज्वराने गंभीर असल्याने मृत्यूशी देतोय झुंज ४. आयपीएल २०२५: आरसीबीच्या १८ वर्षांच्या प्रतीक्षेचा अंत आयपीएलच्या इतिहासात जे कधी घडले नाही, ते २०२५ मध्ये घडले. ‘ई साला कप नामदे’ (हा कप आमचाच आहे) ही घोषणा अखेर सत्यात उतरली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा अवघ्या ६ धावांनी पराभव करत आपली पहिली ट्रॉफी उंचावली. विजयानंतर विराट कोहली आणि आरसीबीचे चाहते कमालीचे भावनिक झालेले पाहायला मिळाले. १८ वर्षांच्या अथक प्रतीक्षेनंतर आरसीबीने मिळवलेला हा विजय क्रिकेट चाहत्यांच्या मनाला चटका लावून जाणारा ठरला.