Yavat Violence : यवत हिंसाचार प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई; १७ जणांना केली अटक
Yavat Violence : समाजमाध्यमात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी शुक्रवारी पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावात तणाव निर्माण झाला होता. दोन गटाकडून दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी पाच वेगवेगळे गुन्हे दाखल करुन १७ जणांना अटक करण्यात आली आहे. तोडफोड प्रकरणात आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. यवतमध्ये शांतता असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावात समाजमाध्यमात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्यानंतर शुक्रवारी तणाव निर्माण झाला. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास दोन गट समोरासमोर आले. दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली. जमावाने वाहनांची तोडफोड केली, तसेच घरांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
शुक्रवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गावास भेट दिली. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, तसेच शांतता पाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक रमेश चाेपडे, गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. गावात बैठकीचे आयेजन करण्यात आले.
यवत गावात जमावंबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. गावात शांतता प्रस्थापित झाली आहे. ग्रामस्थांशी बैठकाीत संवाद साधण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, तसेच कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणू नये.
– संदीपसिंग गिल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण पोलीस
आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्या तरुणाला पोलीस कोठडी
समाजमाध्यमात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्यानंतर यवत गावात तणाव निर्माण झाला. आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्या तरुणाला पोलिसंनी शुक्रवारी ताब्यात घेऊन त्याला अटक केली. तरुणाला शनिवारी दौंड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी तरुणाला पाच ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.





