Yashwant Sahakari Sakhar Karkhana : यशवंत साखर कारखान्याचा १५ वर्षांचा वनवास संपला; बँकांच्या कर्जातून झाली मुक्तता..वाचा सविस्तर
थेऊर (ता. हवेली) येथील श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखाना राज्य सहकारी बँकेच्या सर्व कर्जाची परतफेड केल्यामुळे आज कर्जमुक्त झाला.

Yashwant Sahakari Sakhar Karkhana – थेऊर (ता. हवेली) येथील श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखाना राज्य सहकारी बँकेच्या सर्व कर्जाची परतफेड केल्यामुळे आज कर्जमुक्त झाला.यावेळी कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप म्हणाले की, 31 ऑगस्ट 2025 पर्यंत कारखान्याचे कर्ज 5,485.26 लाख रुपये होते, जे एकरकमी परतफेड योजने अंतर्गत रुपये 3,044.44 लाखांची सूट घेऊन रुपये 2440.82 लाख झाले होते आणि दि. 30 सप्टेंबर 2025 रोजी भरणा करण्यात आले.
आज 23 जानेवारी रोजी कारखाना कार्यस्थळावर राज्य बँकेचे प्राधिकृत अधिकारी विनायक आंगणे, कायदा विभागाचे व्यवस्थापक अमित डी. जोशी, लिगल अधिकारी विनायक किटे उपस्थित होते. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, उपाध्यक्ष किशोर उंद्रे, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक कैलास जरे, पंच बळीराम गावडे व संजय भोरडे उपस्थित होते. मोठ्या संख्येने सभासद शेतकरी व कर्मचारी वर्गही उपस्थित होता.
कारखान्याच्या संचालक मंडळाने बँक ऑफ इंडियाचे (थेऊर शाखा) 1.30 कोटी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे (उरुळीकांचन शाखा) 7.10 कोटी आणि बँक ऑफ बरोडाचे (कुंजीरवाडी शाखा) 3.75 कोटी रुपये थकीत कर्ज भरणा करुन कारखाना पूर्णपणे कर्जमुक्त केला.
सन 2010-11 पासून बंद असलेला कारखाना आता सभासद शेतकर्यांच्या ताब्यात आल्याने पुन्हा चालू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संचालक मंडळ व सभासदांनी नवीन अत्याधुनिक शुगर प्लांट, डिस्टीलरी प्लांट आणि सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरु करून कारखान्याचा भूतपूर्व वैभव पुनर्संचयित करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.





