पुणे – राष्ट्रीय सहकार धोरण निश्चित झाल्यानंतर आता विविध राज्यांमध्ये स्वतंत्र सहकारी धोरण ठरवण्याची प्रक्रिया सुरू असून, महाराष्ट्रासाठी तयार होणारे नवीन सहकारी धोरण सर्वसमावेशक आणि भविष्योन्मुख असेल, असा विश्वास राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन व कॉसमॉस सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सहकार मंथन’ या राज्यस्तरीय परिषदेत उद्घाटक म्हणून बोलताना ते म्हणाले की, सहकार मंत्रालयाकडून विभागनिहाय बैठकांचे आयोजन करून त्या त्या भागातील सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ, अधिकारी व संस्थांचे अनुभव आणि सूचना नोंदवण्यात येत आहेत. या सगळ्या मतांचा समावेश करूनच धोरण अधिक व्यापक बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळच्या सत्रात महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, कॉसमॉस सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. प्रल्हाद कोकरे तसेच ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशनचे अध्यक्ष व लेखक गौतम कोतवाल यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्या काही निवडक संस्थांना ‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड 2025’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कॉसमॉस सहकारी बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी सहकाराच्या सामाजिक भूमिकेवर भर देताना सांगितले की, सहकारातून समृद्धी हवी असेल तर आधी सहकार समाजात रुजला पाहिजे. समाज प्रगतीपथावर नेण्यासाठी सहकार हा अत्यंत उपयुक्त मार्ग आहे. कॉसमॉस बँकेने सर्वसमावेशक धोरण स्वीकारून व्यावसायिक दृष्टिकोनातून यशस्वी वाटचाल केली आहे. याप्रसंगी आपल्या प्रास्ताविकात गौतम कोतवाल यांनी सहकारातील अनिष्ट रूढी ह्या दूर केल्या पाहिजेत असं मत व्यक्त करून सहकारातील कर्मचार्यांनाही सुरक्षित भवितव्य दिलं गेलं पाहिजे असं मत व्यक्त केलं.