Rickshaw Driver Suicide : दारूची नशा आणि संसाराचा दुर्दैवी शेवट; थेऊरमध्ये रिक्षाचालकाच्या आत्महत्येने खळबळ
Rickshaw Driver Suicide : उपचारादरम्यान ससून रुग्णालयात पहाटे मृत्यू; आई, पत्नी आणि मुले शेजाऱ्याकडे असताना रिक्षाचालकाने टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ.

Rickshaw Driver Suicide – थेऊर (ता. हवेली) येथे दारूच्या नशेत रिक्षाचालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. गुरुवारी (दि.23) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून, उपचारादरम्यान शुक्रवारी (दि. 24) पहाटे त्याचा मृत्यू झाला. गणेश शिवाजी पवार (वय 40, रा. थेऊर, ता. हवेली), असे मृत्यू रिक्षाचालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पवार हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांना दारूचे व्यसन होते. गुरुवारी रात्रीही ते दारूच्या नशेत घरी आले होते. नशेत त्यांनी नेहमीप्रमाणे घरच्यांशी वाद घातल्याने, संभाव्य मारहाणीच्या भीतीने आई, पत्नी व मुलगा शेजाऱ्यांच्या घरी जाऊन थांबले होते. रात्री उशिरा पवार झोपले असतील, असा समज करून कुटुंबीय परत घरी आले.
घराचा दरवाजा अर्धवट उघडा व घरातील लाईट बंद असल्याचे दिसले. लाईट सुरू केल्यानंतर गणेश पवार हे घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. यानंतर कुटुंबीयांनी आरडाओरडा केला असता, शेजाऱ्यांनी तत्काळ धाव घेत त्यांना खाली उतरवले आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार केतन धेंडे घटनास्थळी दाखल झाले. बेशुद्ध अवस्थेतील पवार यांना तातडीने ससून रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येणार आहे. गणेश पवार यांनी आत्महत्या का केली, याबाबत लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करत आहेत.





