Nagar | एक महिन्यांत पूर्ण विमा रक्कम देण्याचे लेखी आश्वासन

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा रक्कम न मिळाल्यामुळे ओरियंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयास कुलूप ठोकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर टाळे ठोकण्याचे आंदोलन मागे घेण्यात आले.
नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगाम २०२३ – २४ चा पीक विमा न मिळाल्यामुळे पुणे येथील ओरियंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयास कुलूप ठोकण्याचे आंदोलन जाहीर करण्यात आले होते. स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट, महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमा नरोडे, नगर जिल्हाध्यक्ष निलेश शेडगे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीता वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक विनायक दीक्षित यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर ३१ ऑगस्टपर्यंत सर्व रक्कम अदा करण्याचे लेखी आश्वासन दिले. विमा कंपनीला केंद्र सरकारकडून ९९.२८ कोटी रुपये येणे आहे.
राज्य शासनाकडून १९२७.५२ कोटी रुपये विमा हप्त्याची रक्कम येणे बाकी आहे. ती तीन आठवड्यात मिळेल, अशी खात्री असल्यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत सर्व रक्कम अदा होईल, असे आश्वासन दीक्षित यांनी दिले आहे.
३१ ऑगस्टपर्यंत विमा रक्कम अदा न केल्यास, ३ सप्टेंबररोजी कृषी आयुक्त कार्यालय, पुणे यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अनिल घनवट यांनी दिला. याप्रसंगी शीतल पोकळे, सुनंदा चोरमल,
मंदा गमे, कोमल वानखेडे, आशा महांकाळे, रुकसाना शेख, प्रकाश जाधव, बाळासाहेब घोगरे, श्रीराम त्रिवेदी, मधु काकड, नवनाथ दिघे , संतोष जाधव , चांगदेव वानखेडे आदींसह जिल्ह्यातील विमाधारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





