Nagar | महायुतीच्या उमेदवारीचा तिढा सुटेना; ‘कांबळे की लोखंडे’ एकमत होईना

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीचा तिढा अद्यापही सुटताना दिसत नाही. स्थानिक उमेदवार म्हणून मा.आ.भाऊसाहेब कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती हाती असून, मा.खा.सदाशिव लोखंडे हेही मुंबईत तळ ठोकून आहेत.
आज दुपारपर्यंत शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होणार आहे. त्यात श्रीरामपूरच्या उमेदवाराचे नाव जाहीर होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले यांची उमेदवारी काल निश्चित झाल्यानंतर तालुक्यात महायुतीकडून आता उमेदवार कोण असेल यावर चर्चा सुरू झाल्या. सुरुवातीला काँग्रेसने तिकीट नाकारलेले आ.लहू कानडे यांचे नाव शिंदे शिवसेनेकडून तिकिटासाठी चर्चिले जाऊ लागले.
परंतु आज या चर्चांना पूर्णविराम मिळून कानडे हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे निश्चित झाले. त्यानंतर सेनेकडून सर्व इच्छुकांव्यतिरिक्त नव्या उमेदवाराचे नाव फायनल करण्याच्या चर्चा कानावर येऊ लागल्या.
दरम्यान, दुपारी हा मतदारसंघ भाजपासाठी देऊन त्याबदल्यात नेवासा मतदारसंघ शिवसेनेला घेतल्याची माहिती पुढे आली. या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर दुपारी उशिरा श्रीरामपूर तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मा.आ. भाऊसाहेब कांबळे यांचे नाव निश्चित झाल्याचे चर्चा सुरू झाली. त्यामुळे शिवसेनेच्या लोखंडे गटाच्या कार्यकर्त्यांत चलबिचल वाढली.
नेमकं काय चाललंय याचा अंदाज कुणालाही बांधता येत नव्हता.तालुक्यात जो तो याबाबत विचारणा करीत होता. महायुतीकडून मा. खा.सदाशिव लोखंडे, त्यांचे पुत्र प्रशांत लोखंडे,मा.आ.भाऊसाहेब कांबळे हे प्रमुख इच्छुक आहेत.
त्याचबरोबर जितेंद्र तोरणे, नितीन दिनकर, नितीन उदमले हेही उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. वाढत्या इच्छुकांच्या संख्येमुळे पक्षश्रेष्ठींच्या पुढेही अडचणी वाढल्या आहेत.त्यामुळे श्रीरामपूर महायुतीच्या जागेचा तिढा सुटण्याऐवजी वाढतच चालला आहे.आज हा तिढा सुटतो की आणखी काही नवीन ट्विस्ट या मतदारसंघात निर्माण होतो हे पाहणे औतुक्याचे आहे.





