Nagar | ‘अशोक’ कडून व्याज व कामगारांचा बोनस बँक खात्यात वर्ग

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्याची कामधेनू असलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याने दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर सभासदांच्या जमा ठेवीवरील व्याजाची रक्कम आणि कामगारांच्या ११ टक्के बोनसची रक्कम संबंधित सभासद व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात शुक्रवारी (दि.२५) वर्ग करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे व्हा.चेअरमन हिम्मतराव धुमाळ यांनी दिली.
सन २०१३-१४ च्या गळीत हंगामात १५ मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प कार्यान्वित झालेला आहे. यापूर्वी प्रतिदिन ४० हजार लिटर क्षमतेचा डिस्टीलरी प्रकल्प व प्रतिदिन ४० हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित आहेत. सन २०२३-२४ च्या गळीत हंगामात नविन प्रतिदिन ६० हजार लिटर क्षमतेचा डिस्टीलरी व नविन ६० हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित झाला.
त्यातून प्रतिदिन १ लाख लिटरपर्यंत अल्कोहोल व प्रतिदिन १ लाख लिटरपर्यंत इथेनॉलची निर्मिती होत आहे. त्याचप्रमाणे २२ टी.पी.एच. (टन प्रतितास) क्षमतेच्या नविन इन्सिनरेशन बॉयलरमुळे प्रतितास २ मेगावॅट वीज निर्मिती होऊन त्यावर नविन डिस्टीलरी व नविन इथेनॉल प्रकल्प चालविला जात आहे. याबरोबरच डिस्टीलरीमधून निघणाऱ्या स्पेंटवॉशचा वापर इन्सिनरेशन बॉयलरसाठी इंधन म्हणून केला जात आहे.
त्यामुळे झिरो पोल्युशनचे (शून्य प्रदुषण) उद्दिष्ट साध्य होत आहे. ‘अशोक’ ने दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावली सणापूर्वी कारखान्याकडे सभासदांच्या जमा असणाऱ्या ठेवीवरील व्याजाची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली आहे. याबरोबरच कारखान्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही ११ टक्के बोनसची रक्कम बँक खात्यात वर्ग करण्यात आल्याचे धुमाळ यांनी सांगितले.





