Nagar | मंजूर पिक विम्याच्या रकमेची सरकारकडून तरतूद

कर्जत, (प्रतिनिधी) – कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश असून २०२३-२४ खरीप हंगामातील पीक विम्याच्या मंजूर रकमेची राज्य सरकारकडून तरतूद करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे.
खरीप हंगाम २०२३-२४ साठी शासनाने नियुक्त केलेल्या ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीमार्फत शेतकऱ्यांना पीक विमा दिला जातो.
या कंपनीच्या कार्यक्षेत्रात अहिल्यानगर, नाशिक, सातारा, सोलापूर, जळगाव आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा सामावेश होतो.
या जिल्ह्यांसाठी पीक विम्याची एकूण ७,६२१ कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली होती, यापैकी ५,४५९ कोटी रुपये पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यात आधीच जमा झाले होते.
परंतु विमा कंपनीच्या नियमांच्या पुढील रक्कम राज्य सरकारने देणं भाग होते. मात्र सरकारने त्याची अजूनपर्यंत तरतूद केली नव्हती. त्यासाठी आमदार रोहित पवार यांनी वारंवार पाठपुरावा केला.
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महाराष्ट्र शासनाकडून विमा कंपन्यांना पीक विम्याची मंजूर रक्कम देण्यात यावी आणि नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करावे, अशी मागणी केली होती.
त्यांच्या या मागणीला यश आले असून पीक विम्याची मंजूर रक्कम पीक विमा कंपनीला वितरीत करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात असून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करण्याचे आदेश शासनाकडून पीक विमा कंपनीला देण्यात आले आहेत.





