World Test Championship (2023-2025) | बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 चा दुसरा सामना ॲडलेड येथील ॲडलेड ओव्हल मैदानावर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. यासह ही मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळला गेला, ज्यात टीम इंडियाने विजय मिळवला पण यावेळी ऑस्ट्रेलियाने पलटवार केला. या सामन्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे पॉइंट टेबलही पूर्णपणे बदलले आहे. शेवटची कसोटी जिंकून नंबर-1 बनलेल्या टीम इंडियाने आता हा मुकुट गमावला आहे. तसेच फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशांनाही धक्का बसला आहे.
ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाची विजयाची टक्केवारी 61.11 होती आणि संघ पहिल्या क्रमांकावर होता. मात्र या पराभवानंतर टीम इंडियाची थेट तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. टीम इंडियाची विजयाची टक्केवारी आता 57.29 झाली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघ आता तिसऱ्या क्रमांकावरून थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 57.69 वरून 60.71 इतकी वाढली आहे. याचा अर्थ ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा वाढवल्या आहेत. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेचा संघ 59.26 विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. दुसऱ्या कसोटीतही श्रीलंकेला पराभूत केल्यास त्यांना पहिल्या क्रमांकावर पोहोचण्याची संधी आहे.
ॲडलेडमधील पराभव भारतीय क्रिकेट संघासाठी अनेक अर्थाने वेदनादायी आहे. या पराभवामुळे बॉर्डर-गावस्कर करंडक जिंकण्याचा मार्ग तर अवघड झाला आहेच, पण जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल (डब्ल्यूटीसी फायनल)चा मार्गही कठीण झाला आहे. आता टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ताज्या पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर घसरली आहे. ॲडलेडपूर्वी टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर होती, पण ॲडलेडच्या पराभवाने क्षणार्धात सर्वकाही बदलून टाकले आहे.
भारत WTC च्या अंतिम फेरीत कसा पोहोचेल?
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्याची शर्यत आता अधिकच रोमांचक बनली आहे. तथापि, भारताला अजूनही आपले नशीब नियंत्रित करण्याची संधी आहे. या मालिकेत टीम इंडियाचे अजून 3 सामने बाकी आहेत. अशा स्थितीत भारतीय संघाने उर्वरित तीन सामने जिंकले तर ती मालिका 4-1 ने जिंकेल, म्हणजेच टीम इंडिया कोणत्याही अडचणीशिवाय अंतिम फेरीत पोहोचेल.
IND vs AUS 2nd Test : दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियावर दणदणीत विजय; मालिकेत साधली बरोबरी..
आणखी एक पराभव आणि सर्व आशा संपुष्टात…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. या मालिकेत अजून तीन कसोटी सामने बाकी आहेत. आता टीम इंडियाने एकही कसोटी सामना गमावला, तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या स्वबळावर अंतिम फेरी गाठण्याच्या त्याच्या सर्व आशा संपुष्टात येतील. भारताने एक कसोटी अनिर्णित राखली आणि दोन कसोटी सामने जिंकले तर त्याच्या आशा काहीच प्रमाणात जिवंत राहतील. मात्र, अंतिम फेरीचे तिकीट निश्चित करण्यासाठी भारताला उर्वरित तीन कसोटी सामने कोणत्याही किंमतीत जिंकावे लागतील.
आणखी काही समीकरणे…
त्याचबरोबर टीम इंडियाने ही मालिका 3-1 ने जिंकली तरी अंतिम फेरी गाठण्याचा मोठा दावेदार असेल. त्यासाठी दुसरीकडे, श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेला 2-0 ने विजयाची नोंद करावी लागेल.
त्याचबरोबर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरूध्दची मालिका 3-2 ने जिंकली तर त्यांना श्रीलंकेवर अवलंबून राहावे लागेल. वास्तविक श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 2 कसोटी सामने खेळायचे आहेत. या मालिकेत श्रीलंकेला किमान 1 सामना अनिर्णित ठेवावा लागेल.
दुसरीकडे भारत-आॅस्ट्रेलिया ही मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली तर दक्षिण आफ्रिका संघाने श्रीलंकेला 2-0 ने पराभूत करावे आणि त्यानंतर श्रीलंकेचा संघ ऑस्ट्रेलियाचा 1-0 असा पराभव करेल अशी प्रार्थना टीम इंडियाला करावी लागेल. असे झाल्यास भारतीय संघ सलग तिसऱ्यांदा अंतिम सामना खेळताना दिसणार आहे.