Pune District : चासकमान कालव्याचे काम बंद पाडले
Pune District : गळती ज्या ठिकाणी सर्वाधिक आहे, त्या भागाकडे दुर्लक्ष करुन अन्यत्र अस्तरीकरण करणे म्हणजे सरकारी निधीचा चुकीच्या पद्धतीने वापर असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

न्हावरे : चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा संताप अखेर उफाळून आला. कालव्याच्या सुरुवातीच्या म्हणजेच ‘हेड’कडील भागात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असतानाही प्रशासनाने शेवटच्या टोकाकडून म्हणजेच ‘टेल’कडून अस्तरीकरणाचे काम सुरू केल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी सोमवार (दि २७) सकाळी अकरा वाजता काम बंद पाडले.
आंबळे शेतकरी प्रमोद बेंद्रे यांच्या घरासमोर मशिनरीच्या साहाय्याने कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम सुरु होते. याची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी एकत्र आले. शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत मशिनरी थांबवली. गळती ज्या ठिकाणी सर्वाधिक आहे, त्या भागाकडे दुर्लक्ष करुन अन्यत्र अस्तरीकरण करणे म्हणजे सरकारी निधीचा चुकीच्या पद्धतीने वापर असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
यावेळी शेतकरी कृती समितीचे सदस्य, तात्यासाहेब सोनवणे, दादासाहेब बेंद्रे, आशितोष बेंद्रे, सागर खंडागळे, विशाल झेंडे, गणेश बेंद्रे, पंचायत समिती सदस्य दीपक कोकडे, श्रीराम शेलार, अशोक कोळपे, मयूर बेंद्रे, सचिन बेंद्रे, अक्षय नरवडे, निलेश बेंद्रे, महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कालव्याच्या हेडकडील गळती थांबविल्याशिवाय पुढील भागात अस्तरीकरण करुन अपेक्षित फायदा होणार नाही. पाणी सुरुवातीलाच जमिनीत मुरत असेल, तर शेवटच्या टोकापर्यंत पाणी कसे पोहोचणार, हा साधा प्रश्न जलसंपदा विभागाला का समजत नाही, अशी टीकाही यावेळी केली.
प्रशासनाला अल्टिमेटम
प्रशासनाने अस्तरीकरणाचा संपूर्ण आराखडा शेतकऱ्यांसमोर जाहीर करावा, हेडकडील मुख्य गळतीची ठिकाणे प्रथम दुरुस्त करावीत आणि डाव्या कालव्यात तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे पुन्हा दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.





