Pune District : टाटा मोटर्स कर्मचार्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश
Pune District : वृक्षारोपणानंतर पर्यावरण जनजागृती आणि राजयोग ध्यान यावरील विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये निसर्गाशी सुसंवाद, मानसिक शांतता, पर्यावरण संवर्धन आणि आध्यात्मिक मूल्ये या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

भूगाव : पर्यावरण संवर्धनाची जाणीव रुजविण्यासाठी टाटा मोटर्सच्या कर्मचारी समूहाने सामाजिक दायित्व निधी अंतर्गत आणि ब्रह्माकुमारीज यांच्या सहकार्याने धनवेवाडी (ता. मुळशी) येथील ब्रह्माकुमारीजच्या हृदयमोहिनीवन रिट्रीट सेंटरमध्ये ’माझा वाढदिवस, माझा वृक्ष’ हा अभिनव उपक्रम राबविला. वाढदिवस साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत कर्मचार्यांनी केक आणि पार्टीवरील खर्च टाळून वृक्षारोपण करून पर्यावरणाप्रती असलेली आपली बांधिलकी जपली.
धनवेवाडी येथील सुमारे दोन एकर परिसरात विकसित करण्यात आलेल्या रिट्रीट सेंटरमध्ये कर्मचार्यांनी स्वतःच्या वर्गणीतून केळी, आंबा, जांभूळ आदी विविध प्रकारची झाडे आणि खत आणून वृक्षारोपण केले. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देतानाच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीवही अधोरेखित करण्यात आली. वृक्षारोपणानंतर पर्यावरण जनजागृती आणि राजयोग ध्यान यावरील विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये निसर्गाशी सुसंवाद, मानसिक शांतता, पर्यावरण संवर्धन आणि आध्यात्मिक मूल्ये या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी राजयोगिनी ब्रह्माकुमारी अश्विनी दीदी यांनी ’स्व-परिवर्तनाद्वारे विश्वपरिवर्तन’ या विषयावर मार्गदर्शन करत राजयोगाचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच सिताराम भाई यांनी राजयोगामुळे जीवनात घडलेल्या सकारात्मक परिवर्तनाचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी सात्त्विक आणि योगिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या ब्रह्मभोजन (प्रसाद)ची व्यवस्था करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेंकटेश कुलकर्णी, प्रॉडक्शन हेड, नोव्हा वेल्ड शॉप, टाटा मोटर्स होते. त्यांनी कर्मचार्यांच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक करत ब्रह्माकुमारीजच्या ध्यान केंद्रात मानसिक शांतता, प्रेम आणि आनंदाचा अनुभव आल्याचे सांगितले. प्रमुख पाहुणे अजित पायगुडे, जनरल सेक्रेटरी, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांनी कर्मचार्यांचे अभिनंदन करत सकारात्मक विचारसरणी आणि पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबविण्याचे आवाहन केले. यावेळी टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे प्रतिनिधी राजा नातू, संजय असवले आणि पांडुरंग गोगावले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अजित पाटील, विश्वास भाई, तेजस्विनी दीदी तसेच ब्रह्माकुमारीजच्या सेवाधारी बंधू-भगिनींनी विशेष परिश्रम घेतले. ज्योती दीदी यांनी उपस्थितांचे आभार मानले.





