Pune District : ‘हिरवाई’ अनुभवण्यासाठी पर्यटकांची झुंबड
Pune District : पावसामुळे डोंगदऱ्यांनी हिरवा शालू पांघरला असून, कड्याकपारीतून पांढरेशुभ्र धबधबे कोसळत आहेत.

रांजणी : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आंबेगाव तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग निसर्गाच्या अदभुत रूपाने नटला आहे. डिंभा धरण व कोंढवळ परिसर, गोहे पाझार तलाव, भीमाशंकरचा कडा आणि आहुपे घाटातील विहंगम दृश्ये पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटकांनी या भागात प्रचंड गर्दी केली आहे. शनिवार, रविवारसह शासकीय सुट्टयांच्या दिवशी आनंद घेण्यासाठी पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्थे पश्चिम भागात दाखल होत आहे.
निसर्गाच्या या अथांग रूपाने पर्यटकांना भुरळ घातली आहे. पावसामुळे डोंगदऱ्यांनी हिरवा शालू पांघरला असून, कड्याकपारीतून पांढरेशुभ्र धबधबे कोसळत आहेत. डिंभा धरणाचा विस्तीर्ण जलाशय आणि धुक्याची दुलई पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. आहुपे आणि भीमाशंकर परिसरातील घनदाट जंगलात फिरण्याचा अन् पावसाचा आनंद घेण्याचा मोह पर्यटकांना आवरता येत नाहीये. स्थानिक हॉटेल्समध्ये तयार केलेले गरमागरम मक्याची कणसे, चुलीवरचे जेवण, पिठल-भाकरी आणि रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढल्याने स्थानिक आदिवासी तरूणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. पर्यटकांच्या या अलोट गर्दीमुळे डिंभा भीमाशंकर रस्त्यावर आणि घाट रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. काही उत्साही पर्यटकांकडून धोकादायक ठिकणी सेल्फी काढणे, धबधब्यांच्या प्रवाहात अतिउत्साहाने उतरणे, अशा घटना समोर येत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम डोंगरी भागात सध्या होत असलेल्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचा आणि पाण्याचा प्रवाह अचानक वाढण्याचा धोका असतो. पर्यटकांनी निसर्गाचा आनंद जरूर घ्यावा, मात्र अतिउत्साहाच्या भरात स्वतःचा जीव धोक्यात घालू नये आणि प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार राहुल सारंग यांनी केले आहे.
निसर्गाचे सौंदर्य राखण्यास मदत करा
निसर्गाचे हे रौद्र आणि देखणे रूप अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावले आंबेगावच्या या पश्चिम आदिवासी भागाकडे वळत आहेत. मात्र, निसर्गाच्या सान्निध्यात जाताना सुरक्षिततेचा
बॅलन्स सांभाळणे तितकेच गरजेचे आहे. तसेच प्लॅस्टिकचा कचरा, पाण्याच्या बाटल्या कुठेही न टाकता निसर्गाचे सौंदर्य राखण्यास मदत करावी, असे आवाहन सभापती कैलासबुवा काळे यांनी केले.





