Pune District : ताम्हिणी घाट 25 दिवसांपासून बंद! पर्यटन ठप्प, छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले
Pune District : मात्र व्यवसायच ठप्प झाल्याने कर्जफेड, दैनंदिन खर्च आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.

पौड : मुसळधार पाऊस, रस्ता खचणे आणि दरडी कोसळण्याच्या धोक्यामुळे 5 जुलैपासून बंद असलेला ताम्हिणी घाट अद्यापही वाहतुकीसाठी बंद आहे. सलग 25 दिवस घाट बंद असल्याने मुळशी तालुक्यातील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला असून, पर्यटनावर अवलंबून असलेल्या शेकडो छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक कुटुंबांचे वर्षभराचे आर्थिक गणितच विस्कळीत झाले आहे.
पावसाळ्यात ताम्हिणी घाट, मुळशी धरण परिसर आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळांवर दरवर्षी हजारो पर्यटकांची गर्दी होत असते. या हंगामावर कणीस विक्रेते, चहाच्या टपर्या, भजी-मॅगी व नाश्त्याचे स्टॉल, फळविक्रेते, लहान हॉटेल व्यावसायिक तसेच अन्य लघु उद्योजकांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. मात्र घाट बंद असल्याने पर्यटकांची वर्दळ थांबली असून या सर्वांचा व्यवसाय जवळपास बंद पडला आहे. अनेक व्यावसायिकांनी पावसाळी पर्यटन हंगामाच्या अपेक्षेने कर्ज काढून किंवा उधारीवर माल खरेदी केला होता. मात्र व्यवसायच ठप्प झाल्याने कर्जफेड, दैनंदिन खर्च आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.
रस्ता खचणे आणि दरडी कोसळल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. मात्र धोकादायक ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करून ताम्हिणी घाट लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांकडून होत आहे.
हलक्या वाहनांसाठी मार्ग खुला होणार
दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून आज किंवा उद्या दिशादर्शक फलक उभारण्यात येतील. गुरुवारपर्यंत ताम्हिणी घाट हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी दिली.
नुकसानभरपाईचा प्रश्न ऐरणीवर
घाट बंद राहिल्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या शेकडो छोट्या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या व्यावसायिकांना शासनाकडून आर्थिक मदत अथवा नुकसानभरपाई मिळणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत असून, स्थानिकांकडून तातडीने मदतीची मागणी केली जात आहे.





