Pune District : वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांची धडपड
Pune District : महावितरणच्या मार्गदर्शनाखाली अधिकृत कंत्राटदार शरयू इलेक्ट्रिकल आणि इंद्रजीत इलेक्ट्रिकल यांच्या कर्मचाऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही कामाचा वेग कायम ठेवला.

मंचर : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागातील पाटण परिसरातील गावांत वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी दुर्गम डोंगररांगांमध्ये खांद्यावरून साहित्य वाहून न्यावे लागते. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांची धडपड सुरू असून प्रतिकूल परिस्थितीतही त्यांचे काम सुरू आहे.
घोडेगावच्या पश्चिम भागातील पिंपरी पाटण परिसरात मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे महावितरणच्या उच्च दाब वीजवाहिनीचे मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीत तब्बल दहा वीजखांब कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आणि अनेक गावांतील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. महावितरणच्या मार्गदर्शनाखाली अधिकृत कंत्राटदार शरयू इलेक्ट्रिकल आणि इंद्रजीत इलेक्ट्रिकल यांच्या कर्मचाऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही कामाचा वेग कायम ठेवला.
मुसळधार पाऊस, चिखलमय रस्ते आणि डोंगराळ भूभागामुळे यंत्रसामग्री घटनास्थळी पोहोचणे शक्य नसतानाही कर्मचाऱ्यांनी अवजड लोखंडी खांब, तारा आणि आवश्यक साहित्य खांद्यावर वाहून अनेक किलोमीटर पायपीट करत दुरुस्तीचे काम सुरू ठेवले.अशी माहिती देऊन घोडेगाव महावितरणचे अधिकारी आर. पी. भोपळे म्हणाले, अहोरात्र सुरू असलेल्या या प्रयत्नांमुळे वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच वीज सेवा सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. संकटाच्या काळात स्वतःच्या सुरक्षिततेची पर्वा न करता दुर्गम भागात पोहोचून सेवा देणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या जिद्दीचे आणि कर्तव्यनिष्ठेचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळे बाधित भागातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाला मोठी मदत होत आहे.
मुसळधार पाऊस, दुर्गम डोंगराळ परिसर आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. नागरिकांचा वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहे.
-राहुल गवारे, कार्यकारी अभियंता, महावितरण मंचर.





