Pune District : अदानींचा प्रकल्प होऊ देणार नाही : अतुल बेनके
Pune District : आदिवासी बांधवांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पाविरोधातील संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यात अंजनावळे परिसरात प्रस्तावित खासगी जलविद्युत प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापले असून, स्थानिकांना विश्वासात न घेता प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न झाल्यास अदानींचा बाप आला तरी हा प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा माजी आमदार अतुल बेनके यांनी दिला आहे. आदिवासी बांधवांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पाविरोधातील संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
बेनके म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने आदिवासी पश्चिम पट्टा इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केला असून या भागात खोदकामासंदर्भात विविध निर्बंध लागू आहेत. प्रस्तावित प्रकल्पामुळे अंजनावळे, घाटघरसह अनेक गावांतील आदिवासींच्या जमिनी बाधित होण्याची शक्यता असल्याने स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. दरम्यान, अंजनावळेसह परिसरातील 21 ग्रामपंचायतींना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नोटिसा बजावण्यात आल्या असून, शुक्रवार, दि. 21 ऑगस्ट रोजी शासकीय आश्रमशाळेत या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
हा खासगी प्रकल्प कोणाच्या पुढाकाराने आणि कोणाच्या हितासाठी राबविला जात आहे, असा सवाल आदिवासी नागरिक उपस्थित करत असल्याचेही बेनके यांनी सांगितले. हा शासनाचा प्रकल्प असता, तर लोकप्रतिनिधी म्हणून शासनाकडे पाठपुरावा करता आला असता. मात्र आदिवासींना विस्थापित करून निसर्गाचा र्हास करणारा कोणताही खासगी प्रकल्प आम्हाला मान्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पेसा कायद्यानुसार ग्रामसभेच्या ठरावाला कायदेशीर महत्त्व असल्याचे सांगत, 21 ऑगस्टपूर्वी आदिवासी पश्चिम पट्ट्यातील सर्व ग्रामपंचायतींनी विशेष ग्रामसभा घेऊन प्रस्तावित प्रकल्पाचे पर्यावरणीय परिणाम, जमिनींचे होणारे नुकसान आणि स्थानिकांवरील परिणाम याबाबत ठराव मंजूर करावेत, असे आवाहन त्यांनी केले. या जनजागृतीसाठी जिल्हा परिषद सदस्या माई लांडे, सोनाताई दाभाडे आणि देवराम लांडे गावागावात संपर्क अभियान राबविणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
बेनके यांनी पुढे सांगितले की, आजही आदिवासी भागातील अनेक वाड्या-वस्त्यांमध्ये वीज, दळणवळण, शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत सुविधा अपुर्या आहेत. माणिकडोह धरणाच्या पोटबंधार्याच्या पाण्याचा प्रश्नही प्रलंबित असताना स्थानिकांच्या इच्छेविरुद्ध खासगी प्रकल्प लादण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याला तीव्र विरोध केला जाईल. 21 ऑगस्ट रोजी होणार्या बैठकीत आदिवासी बांधवांसह प्रकल्पाला ठाम विरोध नोंदविणार आहोत. आज विरोध केला नाही, तर भविष्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांतील जुन्नर, आंबेगाव आणि अकोले तालुक्यातील आदिवासींच्या अस्तित्वावरच धोका निर्माण होईल, असा इशाराही अतुल बेनके यांनी दिला.
प्रमुख मुद्दे
- अंजनावळे परिसरात खासगी जलविद्युत प्रकल्पाचा प्रस्ताव.
- अंजनावळे, घाटघरसह 21 ग्रामपंचायतींना प्रदूषण मंडळाच्या नोटिसा.
- 21 ऑगस्ट रोजी शासकीय आश्रमशाळेत सार्वजनिक बैठक.
- पेसा कायद्यानुसार विशेष ग्रामसभा घेण्याचे आवाहन.
- आदिवासींच्या नेतृत्वाखाली प्रकल्पाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा.





