Womens World Cup 2025 : सूर्यानं केलं तेच हरमनप्रीत करणार का? ‘या’ दिवशी येणार भारत-पाकिस्तान आमने-सामने

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने नेहमीच मैदानावरील खेळापेक्षा जास्त गोष्टींमुळे चर्चेत राहतात. आशिया चषक स्पर्धेतील वादग्रस्त घटनांनंतर आता पुन्हा एकदा हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. यावेळी निमित्त आहे वूमन्स वनडे वर्ल्डकपचं. भारतात पाकिस्तान खेळणार नसल्याने हा सामना रविवारी श्रीलंकेच्या कोलंबो येथे होणार आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर ही आशिया चषकात सूर्यकुमार यादवने घेतलेल्या हँडशेक न करण्याच्या भूमिकेचं अनुकरण करणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
आयसीसी नियम आणि हँडशेकचा वाद
वर्ल्डकप ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आयोजित स्पर्धा असून, यात नियम आणि परंपरांचं काटेकोरपणे पालन केलं जातं. सामन्यापूर्वी टॉसवेळी दोन्ही कर्णधारांद्वारे हस्तांदोलन (हँडशेक) करणं ही प्रथा आहे. मात्र, आशिया चषकातील वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानच्या कर्णधार फातिमा साना यांच्यात हस्तांदोलन होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, हरमनप्रीत आणि भारतीय संघाला हँडशेकबाबत कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. सामन्याला अजून आठवड्याचा अवधी असल्याने यासंदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही. आयसीसीच्या स्पर्धेत नियम आणि शिष्टाचाराचं पालन होईल, असं सूत्रांनी स्पष्ट केलं.
आशिया चषकातील वाद आणि सोशल मीडियावरील चर्चा
आशिया चषकात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाशी हस्तांदोलन टाळलं होतं. भारतीय संघानेही पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही. प्राथमिक फेरी, सुपर फोर आणि अंतिम सामन्यात भारताने हीच भूमिका कायम ठेवली. या स्पर्धेत भारताने तिन्ही सामन्यांत पाकिस्तानवर विजय मिळवला. अंतिम सामन्यात तर भारतीय संघाने आणखी एक पाऊल पुढे टाकत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख मोहसीन नक्वी यांच्या हस्ते विजेतेपदाचा करंडक स्वीकारण्यास नकार दिला.
नक्वी यांनी स्वतः करंडक देण्यावर ठाम राहण्याचा प्रयत्न केला परंतु भारताने पर्यायी प्रस्ताव ठेवले. एमिरेट्स क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी करंडक द्यावा किंवा भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील विदेशी प्रशिक्षकांनी तो स्वीकारावा, असे प्रस्तावही नक्वी यांनी फेटाळले. अखेरीस कोणताही तोडगा न निघाल्याने नक्वी करंडक घेऊन परतले. पुरस्कार वितरण सोहळ्यात भारतीय संघाने करंडक स्वीकारण्यास नकार दिल्याचं सूत्रसंचालक सायमन डूल यांनी जाहीर केलं.
या घटनांबरोबरच पाकिस्तानी खेळाडूंच्या काही कृतींमुळेही वाद निर्माण झाला. हारिस रौफने विमान पाडल्याची खूण केली, तर साहिबजादा फरहानने बंदूक चालवल्यासारखं (बझूका) सेलिब्रेशन केलं. यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पाकिस्तानच्या फातिमा सानानेही रौफप्रमाणे सेलिब्रेशन केलं होतं. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी विकेटकीपर-फलंदाज कामरान अकमल याने आक्रमक भूमिका घेतली. “आपण संघाला परत बोलवायला हवं. भारताशी क्रिकेट खेळायला नको. आपण ठाम भूमिका घ्यायला हवी,” असं त्याने म्हटलं.
मैदानाबाहेरील घटनांचा खेळाडूंवर परिणाम
माजी क्रिकेटपटू शोभा पंडित यांच्या मते, मैदानाबाहेरील या घटनांमुळे खेळाडूंवर मानसिक दडपण येऊ शकतं. “खेळात राजकारण आणलं तर त्याचा त्रास खेळाडूंनाच होतो. भारतीय संघाने हँडशेक करणं किंवा न करणं, बोलणं किंवा न बोलणं, याबाबत त्यांना योग्य वाटेल ती भूमिका घ्यावी. पाकिस्तानी खेळाडूही माणसंच आहेत, त्यांच्याही भावना आहेत. तेही जिंकण्यासाठीच खेळतात. सभ्यता आणि नियमांचं पालन करून सामना खेळावा,” असं पंडित यांनी सांगितलं.
माजी क्रिकेटपटू संध्या अगरवाल यांनीही याच मताशी सहमती दर्शवली. “हरमनप्रीत आणि तिच्या संघाने सूर्यकुमार आणि त्याच्या संघाने जशी भूमिका घेतली, तसंच वागावं. सूर्याप्रमाणेच हरमनप्रीतने पाकिस्तानचा सामना करावा. अतिरिक्त दडपण घेऊ नये,” असं त्या म्हणाल्या.
हरमनप्रीतचं स्पष्ट मत
वर्ल्डकपशी संबंधित एका कार्यक्रमात हरमनप्रीतला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. हा कार्यक्रम बंगळुरू आणि कोलंबो येथे स्वतंत्रपणे आयोजित करण्यात आला, जेणेकरून भारत आणि पाकिस्तानचे कर्णधार एकत्र येऊ नयेत. “आम्ही मैदानावर सर्वोत्तम खेळ करू शकतो. आम्ही इतर गोष्टींचा विचार करत नाही. ज्या गोष्टी आमच्या नियंत्रणात नाहीत, त्याकडे आमचं लक्ष नाही. ड्रेसिंग रूममध्ये आम्ही अशा गोष्टींवर चर्चा करत नाही. आम्ही फक्त क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहोत,” असं हरमनप्रीतने ठामपणे सांगितलं.
२०२२ मधील सौहार्दाचं उदाहरण
२०२२ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण पाहायला मिळालं. भारतीय खेळाडू पाकिस्तानच्या बिसमाह मारुफच्या सहा महिन्यांच्या मुलीशी खेळताना दिसले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. स्मृती मंधानाने यासंदर्भात एक पोस्टही शेअर केली होती. “बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणं अत्यंत कठीण आहे. बिसमाह मारुफने जगभरातील क्रिकेटपटूंना एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. तिच्या मुलीला खूप शुभेच्छा. तीही भविष्यात बिसमाहप्रमाणे क्रिकेट खेळेल, अशी आशा आहे,” असं स्मृतीने लिहिलं होतं.





