Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने केला वर्ल्ड रेकॉर्ड! आतापर्यंत कोणालाच न जमलेला केला पराक्रम

Suryakumar Yadav Sets T20 World Record in PBKS vs MI : पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात सुर्यकुमार यादवने शानदार फलंदाजी करून एक अनोखा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने हा विक्रम आयपीएलमध्ये नाही तर एकूण टी-२० क्रिकेटमध्ये केला आहे. या हंगामाच्या सुरुवातीला सूर्याला मोठ्या खेळी करता आल्या नाहीत, परंतु त्याने सर्व सामन्यांमध्ये छोट्या-मोठ्या प्रभावी खेळी खेळून महत्त्वाचे योगदान दिले. त्या खेळींमुळे सूर्याने आपल्या नावावर एक ऐतिहासिक विक्रम रचला आहे. तो टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सलग २५ हून अधिक धावा करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे.
सूर्यकुमार यादवने टेंबा बावुमाला टाकले मागे –
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात २५ धावा काढताच सूर्याने ही कामगिरी केली. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये सलग १४ डावांमध्ये २५ हून अधिक धावा केल्या आहेत. याआधी, टेम्बा बावुमाने सलग १३ डावांमध्ये २५ हून अधिक धावा केल्या होत्या. त्याआधी ब्रॅड हॉग, जॅक रुडोल्फ, कुमार संगकारा, ख्रिस लिन आणि काइल मेयर्स यांनी ११ डावात २५ हून अधिक धावा केल्या होत्या. आता हा विश्वविक्रम सूर्याच्या नावावर आहे.
🎥 ICYMI: How Surya Dada made T20 history 😍✨#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #PBKSvMIpic.twitter.com/2Qfrcs5Jna
— Mumbai Indians (@mipaltan) May 26, 2025
सूर्याने आयपीएलमध्येही रचला इतिहास –
यासोबतच, सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा सलग डावांमध्ये २५ हून अधिक धावा करण्याचा विक्रमही नोंदवला आहे. या मुंबईच्या फलंदाजाने या हंगामात सर्व लीग स्टेज सामन्यांमध्ये २५ हून धावांच्या खेळी केल्या आहेत. त्याच्या आधी, २०१८ मध्ये, केन विल्यमसनने आयपीएलमध्ये सलग १३ डावांमध्ये २५ हून अधिक धावा केल्या होत्या. त्याच वेळी, शुबमनने २०२३ मध्ये सलग १३ डावांमध्ये २५ हून अधिक धावांच्या खेळीही खेळल्या आहेत.
हेही वाचा – PSL 2025 Title : पठ्ठ्याला मानलं! टॉसच्या १० मिनिटांपूर्वी मैदानात पोहोचला अन् लाहोरच्या जेतेपदाचा हिरो ठरला
आयपीएल २०२५ मध्ये सूर्यकुमार एमआयकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू –
आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही. सुरुवातीला त्यांनी सलग अनेक सामने गमावले. त्यावेळी सूर्या देखील बॅटने काही खास कामगिरी करू शकला नाही. पण अर्ध्या हंगामानंतर, या संघाने जोरदार पुनरागमन केले आणि प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. सूर्यकुमार यादवच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, त्याने आतापर्यंत १४ सामन्यांमध्ये ७६.७५ च्या सरासरीने ६१४ धावा केल्या आहेत.





