Women’s T20 World Cup 2024 (Final) : अमेलिया केरची दमदार खेळी, न्यूझीलंडचे द. आफ्रिकेसमोर 159 धावांचे लक्ष्य..

Women’s T20 World Cup 2024 Final (NZ W vs SA W) : आज महिला T20 विश्वचषकाचा अंतिम सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघ आपापल्या पहिल्या विजेतेपदाच्या शोधात आहेत. दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडने 20 षटकांत 5 विकेट गमावत 158 धावा केल्या असून दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठीची 159 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. यादरम्यान अमेलिया केरने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि 38 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 43 धावा केल्या. तर आफ्रिकेकडून नॉनकुलुलेको म्लाबाने सर्वाधिक 2 बळी घेतले.
South Africa need 159 Runs to win their maiden Women’s T20 World Cup Title 🏆 #CricketTwitter #T20WorldCup #SAvNZ pic.twitter.com/DdfaUnNn0h
— Female Cricket (@imfemalecricket) October 20, 2024
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. संघाला पहिला धक्का दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर 16 धावसंख्येवर जॉर्जिया प्लिमरच्या रूपाने बसला. जिने 7 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 09 धावा केल्या. त्यानंतर सुझी बेट्स आणि अमेलिया केर यांनी दुसऱ्या विकेटसाठी 37 धावांची (36 चेंडू) भागीदारी केली. ही भागीदारी 8व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर संपुष्टात आली जेव्हा सुझी बेट्स 31 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 32 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. त्यानंतर संघाला तिसरा धक्का 11व्या षटकात कर्णधार सोफी डिव्हाईनच्या (06) रूपाने बसला.
त्यानंतर ब्रुक हॅलिडे आणि अमेलिया केर यांनी चौथ्या विकेटसाठी 57 धावांची (44 चेंडू) भागीदारी केली. ही उत्कृष्ट भागीदारी 18व्या षटकात संपुष्टात आली जेव्हा ब्रुक हॅलिडे 28 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 38 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर शानदार खेळी करणाऱ्या अमेलिया केरने 43 धावा करत पॅव्हेलियनचा रस्ता धरला. त्यानंतर सहाव्या विकेटसाठी मॅडी ग्रीन आणि इसाबेला गेज यांनी 17 धावांची (7 चेंडू) अखंड अशी भागीदारी करत निर्धारित षटकात संघाला 158 धावांपर्यंत नेले.
आफ्रिकन गोलंदाजांची कामगिरी …
आफ्रिकेकडून नॉनकुलुलेको म्लाबाने सर्वाधिक 2 बळी घेतले. यादरम्यान तिने 4 षटकात 31 धावा दिल्या. याशिवाय अयाबोंगा खाका, नादिन डी क्लार्क आणि क्लो ट्रायॉन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. यादरम्यान अयाबोंगा खाकाने 4 षटकांत 44 धावा, नदिन डी क्लर्कने 2 षटकांत 17 धावा आणि क्लो ट्रायॉनने 4 षटकांत 22 धावा दिल्या.
नवा चॅम्पियन मिळणार…
दरम्यान, आज महिला T20 फॉरमॅटमध्ये जगाला एक नवा चॅम्पियन मिळणार आहे. या दोन्ही संघांनी या फॉरमॅटमध्ये कधीही विश्वचषक जिंकलेला नाही. न्यूझीलंडच्या महिला संघाने 2000 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर दक्षिणेला अद्याप आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना इतिहास रचण्याची संधी आहे.





