Women’s T20 World Cup 2024 : इंग्लंडचा सलग तिसरा विजय, स्कॉटलंडला 10 गडी राखून केलं पराभूत…

Women’s T20 World Cup 2024 (ENG W vs SCO W) : इंग्लंडच्या महिला संघाने रविवारी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धेत स्कॉटलंडचा 10 गडी राखून पराभव केला. हा इंग्लंड संघाचा सलग तिसरा विजय तर स्कॉटलंडचा सलग चौथा पराभव ठरला. यासह ‘ब’गटात इंग्लंडने अव्वल स्थान पटकावत उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या संधी मजबूत केली तर स्कॉटलंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
England dominate Scotland to make it three wins from three!https://t.co/uvySKrI0ow | #T20WorldCup pic.twitter.com/JigDL18yBL
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 13, 2024
स्कॉटलंड संघाला निर्धारित 20 षटकांमध्ये सहा बाद 109 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचे सलामीवीर मायिया बाउचियर आणि डॅनी वॉट हॉज यांनी चमकदार कामगिरी केली. दोघींनीही अवघ्या 10 षटकांत 113 धावा करताना सहज लक्ष्य गाठले आणि संघाच्या रनरेटमध्येही वाढ केली.
बाऊचियरला डावाच्या सुरुवातीलाच जीवदान मिळाले.त्याचा फायदा घेत तीनं 34 चेंडूत नाबाद 62 धावा केल्या तर वॅट हॉजने 26 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. बाउचियर हिने आपल्या खेळीत 12 तर डॅनी वॉट हिने 7 चौकार लगावले.बाऊचियर सामन्याची मानकरी ठरली.
तत्पूर्वी, स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.स्कॉटलंड संघाकडून फलंदाजीत कर्णधार सारा ब्राइस हिने 31 चेंडूत 27 धावा आणि कॅथरीन ब्राइस हीने 28 चेंडूत 33 धावा करताना चांगले योगदान दिले. या दोघींशिवाय सास्किया हॉर्ले (13), आयल्सा लिस्टर (11) आणि मेगन मॅकॉल (नाबाद 10) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. इंग्लंडकडून सोफी एक्लेस्टनने दोन बळी घेतले. नेट शिव्हर्स ब्रंट, लॉरेन बेल, शार्लोट डीन आणि डॅनियल गुब्सिन यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.





