Rohit Sharma : ‘मनात खूप काही चाललं होतं अन् रात्रभर…’, रोहितने सांगितल्या टी-२० विश्वचषक विजयाच्या आठवणी

Rohit Sharma shares his emotion : २९ जून २०२४ रोजी भारताने केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून जेतेपद पटकावले होते. या जेतेपदासह ११ वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. आता या महान विजयाच्या ठीक एक वर्षानंतर रोहित शर्माने त्या ऐतिहासिक विजयापूर्वीच्या भावना आणि दडपणाबाबत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
रात्रभर झोपू शकलो नाही – रोहित शर्मा
रोहित शर्मा म्हणाला, “तेरा वर्षे हा खूप मोठा कालावधी आहे. काही खेळाडूंची कारकीर्दसुद्धा इतकी लांब नसते. मी यापूर्वी २००७ मध्ये विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे माझ्यासाठी यापेक्षा मोठी गोष्ट काहीच असू शकत नाही. मी रात्रभर झोपू शकलो नाही. माझ्या मनात फक्त विश्वचषकाचेच विचार सुरू होते. मी इतका घाबरलो होतो की माझ्या पायांना जणू ताकदच उरली नव्हती.”
मनात खूप काही चाललं होतं –
View this post on Instagram
रोहित पुढे म्हणाला, “मनात खूप काही चाललं होतं, पण मी ते बाहेर दाखवलं नाही. आम्हाला सकाळी साडेआठ किंवा नऊ वाजता निघायचं होतं, पण मी सकाळी सात वाजताच उठलो. माझ्या खोलीतून मैदान दिसत होते आणि मी फक्त त्याकडे एकटक पाहत राहिलो. मी स्वतःला म्हणालो, दोन तासांत मी तिथे खेळत असेन, आणि चार तासांत सर्व काही निश्चित होईल. एकतर कप आमच्याकडे असेल… किंवा नसेल.”
हेही वाचा – SA vs ZIM : केशव महाराजचा ऐतिहासिक पराक्रम! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला दक्षिण आफ्रिकन फिरकीपटू
२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारताला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे रोहित शर्मावर विश्वचषक जिंकण्याचा प्रचंड दबाव होता. ३८ वर्षीय रोहितसाठी ही कर्णधार म्हणून पहिली आयसीसी ट्रॉफी होती. तो २००७ च्या टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा देखील भाग होता. २०२४ च्या या टी-२० विश्वचषकात त्याने १५५ हून अधिकच्या स्ट्राइक रेटने २५७ धावा करत संघातील दुसरा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला होतो.
सगळ्यांचा श्वास रोखला होता –
या सामन्यात सूर्यकुमार यादवने लांब सीमारेषेवर एक अविश्वसनीय झेल घेत मिलरला बाद केले आणि भारताला सामन्यात परतण्याची संधी मिळाली. सूर्याच्या झेलबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “मी लॉन्ग ऑनवर होतो आणि तो झेल… खरं सांगायचं तर, तोच सामन्याचा निर्णायक क्षण होता. वाटत होतं की चेंडू षटकारासाठी जाणार, पण सूर्याने हवेत झेप घेतली आणि झेल पकडला. वाऱ्यानेही चेंडूला थोडं मागे खेचलं असावं. थर्ड अंपायरचा निर्णय येईपर्यंत सगळ्यांचा श्वास रोखला होता.”





