Hardik Pandya : ‘ते ७-८ महिने माझ्यासाठी खूप…’, हार्दिकने सांगितली टी-२० विश्वचषकाच्या विजयाची आठवण, पाहा VIDEO

Hardik Pandya shares emotional video : भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने भारताच्या टी-२० विश्वचषक २०२४ विजेतेपद पटकावून एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने त्या ऐतिहासिक क्षणाची आठवण करून दिली, जेव्हा भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला सात धावांनी पराभव करून ११ वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफीवर नाव कोरले होते.
हार्दिकने जेतेपदात बजावली महत्त्वपूर्ण भूमिका –
हार्दिक पंड्याने अंतिम सामन्यात फलंदाजी करताना दोन चेंडूंवर ५ धावा जोडल्या आणि गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत ३ षटकांत २० धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या. त्याने हेनरिक क्लासेन (५२ धावा) याची महत्त्वाची विकेट घेऊन भारताला सामन्यात पुनरागमन करुन दिले.
हार्दिकने ऐतिहासिक आठवणींना दिला उजाळा –
A day I’ll never forget. A day we’ll never forget. For all of us, India 🇮🇳❤️ pic.twitter.com/gWxxbdcCv0
— hardik pandya (@hardikpandya7) June 29, 2025
या ऐतिहासिक जेतेपदाबद्दल बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला, “माझ्यासाठी देशासाठी खेळणे हे एक स्वप्न होते, एक आशीर्वाद होता. २०११ मध्ये मी रस्त्यावर होतो, त्या संघांसाठी जल्लोष करत होतो. मला नेहमी अशा परिस्थितीत राहायला आवडते. त्यामुळे माझ्यातील सर्वोत्तम कामगिरी बाहेर येते. मी नेहमी स्वतःला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील शेवटचा चेंडू टाकताना किंवा अंतिम धाव घेताना कल्पना केली होती. मागील ७-८ महिने खूप कठीण होते, पण त्या दिवशी सर्व काही मनातून निघून गेले. त्यावेळी मी फक्त हाच विचार करत होतो ‘अखेर, मी देशासाठी हे करून दाखवले.”
हेही वाचा – IND vs ENG : भारताविरुद्धच्या पराभवानंतर इंग्लंडसाठी वाईट बातमी, आयसीसीने संपूर्ण संघावर केली मोठी कारवाई
शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर डेव्हिड मिलरने लॉन्ग ऑफच्या दिशेने उंच शॉट खेळला, परंतु तो सीमारेषा ओलांडू शकला नाही. सूर्यकुमार यादवने सीमारेषेजवळ अप्रतिम संतुलन दाखवत चेंडू हवेत उडवला आणि स्वतः पुन्हा मैदानात येऊन झेल पूर्ण केला. हा झेल आयसीसी स्पर्धांच्या इतिहासातील सर्वोत्तम झेलांपैकी एक मानला गेला.





