Women’s T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, अनुभवी फिरकी गोलंदाजास वगळले…

Women’s T20 World Cup 2024 : – महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचे यंदा नववे वर्ष आहे. आतापर्यंत झालेल्या आठ पर्वात सहा विजेतेपदावर ऑस्ट्रेलियाने नाव कोरले आहे. तर एकदा इंग्लंड आणि एकदा वेस्ट इंडिजने नाव कोरले आहे. भारताची आयसीसी चषकांची झोळी अद्याप रितीच आहे. २००९ मध्ये इंग्लंड, २०१० ऑस्ट्रेलिया, २०१२ मध्ये ऑस्ट्रेलिया, २०१३ मध्ये ऑस्ट्रेलिया, २०१५ मध्ये वेस्ट इंडिज, २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया, २०१९मध्ये ऑस्ट्रेलिया, २०२२ मध्ये ऑस्ट्रेलिया असे विजेतेपदावर नाव कोरले आहे. आता नवव्या पर्वाचे बिगुल वाजले असून 3 ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
या स्पर्धेच्या ४० दिवसाआधीच ऑस्ट्रेलियाने संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व यष्टीरक्षक एलिसा हिली ही करणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अनुभवी डावखुरा फिरकी गोलंदाज जेस जोनासेनला या संघात स्थान देण्यात आलेले नाही. जोनासनने २०४ आंतरराष्ट्रीय सामन्यात २४४ बळी घेतले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध २०२३ मध्ये मालिका खेळल्यानंतर टी-२० संघात स्थान मिळालेले नाही. तसेच २०२३ वर्षाच्या शेवटी भारताविरुद्ध वानखेडेत कसोटी खेळली होती. बिग बॅश २०२३ स्पर्धेत २४ बळी घेतले आहेत. तर वुमन्स प्रीमियर लीग २०२४ मध्ये ११ बळी तीच्या नावावर आहेत.
ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या गटात आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना ४ ऑक्टोबरला श्रीलंकेशी होणार आहे. ८ ऑक्टोबर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत. ११ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड लढत होईल. तर भारत आणि ऑस्ट्रेलिया १३ ऑक्टोबरला आमनेसामने येतील.
टी-२० स्पर्धेचे बांगलादेशमध्ये आयोजन करण्यात आले होतं. पण राजकीय उलथापालथ आणि हिंसक वातावरण पाहता आयसीसीने टी-२० स्पर्धा हलवण्याचा निर्णय घेतला. आता ही स्पर्धा दुबईच्या शारजाह स्टेडियममध्ये होणार आहे. ३ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत एकूण१० संघ सहभागी होणार आहेत. पहिल्या उपांत्य फेरीचा सामना १७ ऑक्टोबरला, तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना १८ ऑक्टोबरला होणार आहे. अंतिम सामना २० ऑक्टोबरला होणार आहे.
Women’s T20 World Cup 2024 : टी- 20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, कर्णधारपदात मोठा बदल…
ऑस्ट्रेलिया टी-२० संघ – एलिसा हिली (कर्णधार), डार्सी ब्राउन, ऍश गार्डनर, किम गर्थ, ग्रेस हॅरिस, अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅक्ग्रा (उपकर्णधार), सोफी मोलिनेक्स, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शट, अनाबेल सदरलँड , जॉर्जिया वेरेहॅम, टायला व्लेमिंक.





