AUS W vs BAN W : अॅलिसा हीलीचे सलग दुसरे शतक! ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशवर १० विकेट्सनी दणदणीत विजय

AUS W vs BAN W Australia beat Bangladesh : विशाखापट्टणम येथील एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर आयसीसी महिला वनडे विश्वचषक 2025 मधील 17वा सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश आमनेसामने आले होते, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने बांगलादेशवर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. बांगलादेशने 199 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 24.5 षटकांत लक्ष्य गाठले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे, तर बांगलादेशचा संघ जवळपास स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
बांगलादेशची फलंदाजी: सोभना मोस्तारीची झुंज
टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या बांगलादेशची सुरुवात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांपुढे अडखळत झाली. तरीही, संघाने 50 षटके खेळत 9 बाद 198 धावांपर्यंत मजल मारली. सोभना मोस्तारीने 80 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 66 धावांची खणखणीत खेळी केली. तिने संयम आणि कौशल्य दाखवत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. सलामीवीर रुबिया हैदरने 59 चेंडूत 44 धावांचे योगदान दिले. या दोघींमधील महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे बांगलादेशला लढण्यासाठी आधार मिळाला. याशिवाय शर्मिन अख्तरने 19, तर कर्णधार निगार सुलतानाने 12 धावांचे योगदान दिले.
हीली का शानदार फ़ॉर्म जारी है, ऑस्ट्रेलिया ने बांग्लादेश को 10 विकेट से मात दी है #AUSvsBAN #WomensWorldCup2025 pic.twitter.com/QV8QS5ZZK7
— ESPNcricinfo हिंदी (@CricinfoHindi) October 16, 2025
ऑस्ट्रेलियाची प्रभावी गोलंदाजी –
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांना सातत्याने दडपणाखाली ठेवले. अॅश्ले गार्डनर, ॲनाबेल सदरलँड, अलाना किंग आणि जॉर्जिया वॉरहम यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले, तर वेगवान गोलंदाज मेगन स्कटला एक यश मिळाले. बांगलादेशच्या फलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांपुढे मोकळेपणाने खेळता आले नाही.
हेही वाचा – Ranji Trophy 2025 : केरळच्या टॉप ऑर्डरला महाराष्ट्राच्या गोलंदाजांचा झटका! ३५ धावांवर गमावल्या ३ विकेट्स
अॅलिसा हीली आणि फोएबे लिचफिल्ड यांचे वर्चस्व –
199 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर अॅलिसा हीली आणि फोएबे लिचफिल्ड यांनी बांगलादेशी गोलंदाजांना कुठलीही संधी दिली नाही. पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळ करत त्यांनी 24.5 षटकांत 202 धावांची अखंड भागीदारी करत संघाला 10 गडी राखून विजय मिळवून दिला. अॅलिसा हीलीने 77 चेंडूत 20 चौकारांसह नाबाद 113 धावांची खणखणीत खेळी केली, तर लिचफिल्डने 72 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांसह नाबाद 84 धावा केल्या. या दोघींनी सामना पूर्णपणे एकतर्फी बनवला.
हेही वाचा – Ranji Trophy 2025 : पारस डोगराचं रणजीत विक्रमी शतक, वसीम जाफरनंतर ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसराच खेळाडू
ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व कायम –
या विजयासह ऑस्ट्रेलियाने 5 सामन्यांत 4 विजय आणि 1 रद्द सामन्यासह 9 गुण मिळवले आहेत. दुसरीकडे, बांगलादेशला 5 सामन्यांत चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले, ज्यामुळे त्यांच्या उपांत्य फेरीतील आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, महिला क्रिकेटमधील ते सर्वात मजबूत संघांपैकी एक आहेत आणि त्यांचे लक्ष्य आता थेट विश्वचषकावर आहे.





