Satara: बचत गटांद्वारे महिलांनी आत्मनिर्भर बनावे डॉ. प्रिया शिंदे; कोयनामाई महिला प्रभाग संघाची वार्षिक सभा उत्साहात
Satara शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन प्रत्येक महिलेने आत्मनिर्भर बनावे आणि आपल्या गावाच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रभाग संघाच्या कामकाजाचा आढावा, आर्थिक अहवाल तसेच आगामी नियोजन सादर झाले.

Satara: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत उमेद अभियानांतर्गत बचत गटांची मोठी चळवळ जिल्ह्यात उभी राहिली आहे. या बचत गटांच्या माध्यमातून महिलांची आर्थिक उन्नती होत असून महिला आत्मनिर्भर होत आहेत, असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी व्यक्त केले.
तांबवे (ता. कराड) येथे कोयनामाई महिला प्रभाग संघाच्या तिसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. प्रिया शिंदे बोलत होत्या. प्रभाग संघाच्या अध्यक्षा सुरेखा बाबर, सचिव छाया देसाई तसेच कोषाध्यक्ष अंजली चव्हाण उपस्थित होत्या. कार्यक्रमास कराड पंचायत समितीच्या सभापती नंदाताई यादव, जिल्हा परिषद सदस्य धनंजय ताटे, पंचायत समिती सदस्य दिनेश कुंभार, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी शैलेश पाटील, तालुका अभियान व्यवस्थापक नीलेश पवार, तालुका व्यवस्थापक नीता एडके, श्रीकांत कुंभारदरे, तसेच प्रवीण देसाई, कराड पंचायत समिती अंतर्गत उमेद अभियानातील प्रभाग समन्वयक, तांबवे प्रभागातील १९ गावांमध्ये कार्यरत ३२८ स्वयंसहायता समूहांतील महिला या सभेस उपस्थित होत्या. कॅन्सरमुक्त समाज घडविण्यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचे महत्त्व, रासायनिक शेतीचे दुष्परिणाम, प्लॅस्टिकमुक्त गाव व पर्यावरण संवर्धनाची आवश्यकता, आरोग्यदायी जीवनशैली, महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन तसेच बचत गटांच्या माध्यमातून उद्योग- व्यवसाय उभारणी याविषयी मार्गदर्शन केले.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन प्रत्येक महिलेने आत्मनिर्भर बनावे आणि आपल्या गावाच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रभाग संघाच्या कामकाजाचा आढावा, आर्थिक अहवाल तसेच आगामी नियोजन सादर झाले. उमेद अभियानामुळे झालेल्या प्रगतीची माहिती महिलांनी दिली. विविध उपक्रमांद्वारे आर्थिक सक्षमीकरणाचा निर्धार व्यक्त केला. उद्योग व्यवसाय स्टॉलची पाहणी करण्यात आली. या आयोजनासाठी संघाचे सर्व पदाधिकारी, ग्रामसंघ पदाधिकारी, अभियानातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सुरेखा बाबर यांनी प्रास्ताविक केले. विद्या माळी यांनी अहवाल वाचन केले. धनंजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कोषाध्यक्ष अंजली चव्हाण यांनी आभार मानले.





