Satara: राज्य सरोगसी व सहाय्यक प्रजनन तंत्र मंडळाच्या सदस्यपदी डॉ. समता माने
Satara भारत सरकारने सरोगसी आणि सहाय्यक प्रजनन तंत्र (ART) क्षेत्रात पारदर्शकता, सुरक्षितता आणि नैतिकता सुनिश्चित करण्यासाठी हे दोन्ही कायदे लागू केले आहेत. सरोगसी (नियमन) अधिनियमांतर्गत व्यावसायिक सरोगसीवर बंदी घालण्यात आली असून केवळ कायद्यातील अटी पूर्ण करणाऱ्या गरजू दाम्पत्यांसाठी परोपकारी (Altruistic) सरोगसीला परवानगी देण्यात आली आहे.

Satara: यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालयातील प्रा. डॉ. समता माने यांची सरोगसी (नियमन) अधिनियम, २०२१ आणि सहाय्यक प्रजनन तंत्र (नियमन) अधिनियम, २०२१ अंतर्गत गठित करण्यात आलेल्या राज्य मंडळाच्या सदस्यपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सातारा जिल्ह्यासह समाजकार्य क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद बाब मानली जात आहे.
भारत सरकारने सरोगसी आणि सहाय्यक प्रजनन तंत्र (ART) क्षेत्रात पारदर्शकता, सुरक्षितता आणि नैतिकता सुनिश्चित करण्यासाठी हे दोन्ही कायदे लागू केले आहेत. सरोगसी (नियमन) अधिनियमांतर्गत व्यावसायिक सरोगसीवर बंदी घालण्यात आली असून केवळ कायद्यातील अटी पूर्ण करणाऱ्या गरजू दाम्पत्यांसाठी परोपकारी (Altruistic) सरोगसीला परवानगी देण्यात आली आहे.
तसेच महिलांचे शोषण रोखणे, सरोगेट मातांचे हक्क संरक्षण करणे आणि जन्मलेल्या बालकांच्या हिताचे रक्षण करणे हा या कायद्याचा प्रमुख उद्देश आहे. सहाय्यक प्रजनन तंत्र (नियमन) अधिनियम, २०२१ अंतर्गत आयव्हीएफ (IVF), आययूआय (IUI) यांसारख्या उपचार पद्धती, एआरटी केंद्रे आणि गॅमेट बँकांचे नोंदणीकरण व नियमन करण्यात आले आहे. या कायद्यामुळे वंध्यत्व उपचार प्रक्रियेत गुणवत्ता, पारदर्शकता, रुग्णांचे अधिकार आणि नैतिक मानकांचे पालन सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे.
राज्य मंडळावर सदस्य म्हणून डॉ. समता माने या दोन्ही कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन, जनजागृती, धोरणात्मक सूचना तसेच समाजहिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या निवडीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण माने, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शाली जोसेफ, उपप्राचार्य भाई माने, प्राध्यापक, माजी विद्यार्थी संघ व विद्यार्थी यांनी डॉ. समता माने यांचे अभिनंदन केले. समाजकार्य क्षेत्रातील त्यांचा अनुभव आणि अभ्यास राज्यस्तरीय मंडळाच्या कार्याला निश्चितच दिशा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





