Satara: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज (माउली) यांच्या पालखी सोहळ्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने व्यापक सुरक्षा नियोजन केले आहे. जिल्ह्यात उद्या बुधवारी दि. १५ रोजी दाखल होणारी माउलींची पालखी १८ जुलैपर्यंत जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार असून या कालावधीत वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा पोलीस दलासह बाहेरील जिल्ह्यांतील पोलीस, एसआरपीएफ, होमगार्ड, वाहतूक पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि साध्या वेशातील पथके तैनात करण्यात आली आहेत. पालखी सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी पोलिसांनी आधीच प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली असून २४ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. आणखी १६ जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव प्रक्रियेत आहेत. पालखी मार्ग, मुक्काम स्थळे आणि गर्दीच्या ठिकाणी पाकीटमारी, चोऱ्या तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी डीबी पथके २४ तास गस्त घालणार आहेत. बंदोबस्तासाठी जिल्हा पोलीस दलातील ६३ अधिकारी, ७३९ पुरुष व ९७ महिला पोलीस, १,३०० होमगार्ड, ७५ वाहतूक पोलीस, दोन आरसीपी प्लाटून आणि एक बॉम्ब शोधक व नाशक पथक तैनात करण्यात आले आहे. याशिवाय कोल्हापूर, सांगली आणि रायगड जिल्ह्यांतून अतिरिक्त पोलीस बळ, १८ अधिकारी, ३० वाहतूक अंमलदार आणि एसआरपीएफ कंपनीचीही मदत घेण्यात आली आहे. पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. गर्दीचा फायदा घेणारे पाकीटमार, महिलांशी गैरवर्तन करणारे तसेच बेदरकार वाहनचालकांविरोधात तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन नागरिक व वारकऱ्यांना करण्यात आले आहे. सातारा पोलीस प्रशासनाने पालखी सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्वतोपरी तयारी पूर्ण केल्याचे सांगितले आहे.