Phaltan: भेसळयुक्त दूधप्रकरणी फलटणला तिघांवर गुन्हा
Phaltan चौकशीदरम्यान ही पावडर पाणी मिसळून गाईच्या दुधात मिसळून कृत्रिम भेसळयुक्त दूध तयार करून ते सोमनाथ डेअरी (वडगाव निंबाळकर, ता. बारामती) येथे पुरवठा करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच या पावडरचा पुरवठा नीरा येथील मोरे नामक व्यक्तीकडून झाल्याची माहिती मिळाली.

Phaltan: येथे कृत्रिम भेसळयुक्त दूध तयार करुन डेअरीला पुरवठा करणार्या तिघा जणांविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहिती अशी, मौजे होळ येथे सौ. मंगल दिलीप भोसले व त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यातील गोठ्याजवळील खोलीत पदार्थ मिश्रित करण्यासाठी वापरला जाणारा मिक्सर आढळून आला. या पदार्थांचे नमुने घेऊन उर्वरित साठा व मिक्सर जप्त करण्यात आला.
चौकशीदरम्यान ही पावडर पाणी मिसळून गाईच्या दुधात मिसळून कृत्रिम भेसळयुक्त दूध तयार करून ते सोमनाथ डेअरी (वडगाव निंबाळकर, ता. बारामती) येथे पुरवठा करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच या पावडरचा पुरवठा नीरा येथील मोरे नामक व्यक्तीकडून झाल्याची माहिती मिळाली. प्राथमिक तपासात कृत्रिम दूध निर्मिती, अपमिश्रकांचा पुरवठा, भेसळयुक्त दूध स्वीकारणे व पुरवठा साखळीत अनेक व्यक्तींचा सहभाग असल्याचा प्रथमदर्शनी संशय निर्माण झाला असून आर्थिक व्यवहार, डिजिटल पुरावे व इतर संबंधित बाबींची सखोल चौकशी आवश्यक आहे.
या कृत्यामुळे सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाल्याने सातारा अन्न व औषध प्रशासनच्या अन्न सुरक्षा अधिकारी रुपाली खापणे यांनी सौ. मंगल दिलीप भोसले, दिलीप भीमराव भोसले, कुणाल दिलीप भोसले, संशयित पुरवठादार मोरे तसेच संबंधित डेअरीचे जबाबदार संचालक/मालक यांच्याविरुद्ध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करून सखोल तपास करण्याबाबतची फिर्याद दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे तपास करीत आहे.





