Satara: माण, खटावमध्ये अजूनही ४९ टॅंकरने पाणी पुरवठा; जिल्ह्यात ६५ गावांमध्ये विदारक परिस्थिती
Satara जून महिन्यात जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. मात्र, माण व खटाव तालुक्याला पावसाने हुलकावणी दिल्याने या तालुक्यात अद्यापही टंचाईच्या झळा जाणवत आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस झाला असला तरी चार तालुके अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

Satara: जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने काही प्रमाणात हजेरी लावली असली तरी दुष्काळी तालुक्यांना अद्यापही टंचाईच्या झळा बसत आहेत. माण व खटाव तालुक्यांत ५५ गावे व ३२९ वाड्यांमध्ये अद्यापही टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ६५ गावांमध्ये विदारक परिस्थिती आहे. पावसाने अशीच ओढ दिल्यास आगामी काळात आणखी तीव्र पाणी टंचाई भेडसावण्याची शक्यता आहे.
जून महिन्यात जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. मात्र, माण व खटाव तालुक्याला पावसाने हुलकावणी दिल्याने या तालुक्यात अद्यापही टंचाईच्या झळा जाणवत आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस झाला असला तरी चार तालुके अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जुलै महिना अर्धा संपत आला तरी अशी परिस्थिती राहिल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. माण तालुक्यात ४१ गावे व २६८ वाड्यांमध्ये टंचाईची परिस्थिती असून ४९ खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या पाण्यावर ६७ हजार ७५६ लाेकसंख्या व ८९ हजार ६२९ पशुधन अवलंबून आहे.
खटाव तालुक्यात १४ गावे व ६१ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून १२ हजार ७१८ लाेकसंख्या व ३ हजार ३५७ पशुधन या पाण्यावर अवलंबून आहे. खंडाळा तालुक्यात एका गावात टॅंकरने पाणी पुरवठा होत असून ५०६ लाेकसंख्या व १८८ पशुधन या पाण्यावर अवलंबून आहे. कोरेगाव तालुक्यात ९ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत असून १५ हजार ९०९ लाेकसंख्या व १० हजार २०३ पशुधन या पाण्यावर अवलंबून आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ३४ विहीरी व १९ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे.





