मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या कबुतरखान्यांवरील कारवाईने शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. दादरच्या कबुतरखान्याला ताडपत्रीने झाकून बंद केल्याने आणि कबुतरांना खाद्य देण्यास बंदी घातल्याने जैन आणि गुजराती समाजात नाराजी पसरली आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कबुतरांना दाणे टाकण्यास मनाई केल्याने संतप्त झालेल्या व्यक्तीने एका 69 वर्षीय वृद्ध आणि त्यांच्या मुलीवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाने कबुतरखाना वादाने नवे वळण घेतले आहे. नेमकं काय घडलं? मीरा रोड येथील डी.बी. ओझोन इमारतीजवळ रविवारी (2 ऑगस्ट) सकाळी घडलेल्या या घटनेत 69 वर्षीय महेंद्र पटेल आणि त्यांची मुलगी प्रेमल पटेल (46) यांना मारहाण झाली. महेंद्र पटेल दूध आणण्यासाठी बाहेर गेले असताना त्यांचे शेजारील इमारतीत राहणाऱ्या आशा व्यास (56) कबुतरांना दाणे टाकत होत्या. BMC च्या बंदीच्या पार्श्वभूमीवर महेंद्र यांनी आशा यांना कबुतरांना दाणे टाकू नका, असं सांगितलं. यावरून आशा यांनी त्यांना शिवीगाळ केली. हा वाद ऐकून महेंद्र यांची मुलगी प्रेमल पटेल इमारतीखाली आली आणि तिने आशा यांना जाब विचारला. यानंतर आशा यांच्यासोबत राहणारा सोमेश अग्निहोत्री आणि दोन अन्य व्यक्ती तिथे आले. सोमेशने लोखंडी रॉडने प्रेमल यांना मारहाण केली, तर दुसऱ्या व्यक्तीने त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात महेंद्र आणि प्रेमल दोघेही जखमी झाले. काशीमीरा पोलिसांनी सोमेश अग्निहोत्री, आशा व्यास आणि दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दादर कबुतरखाना बंद मुंबईतील दादर कबुतरखाना हा 1933 पासूनचा ग्रेड-II वारसा स्थळ आहे, BMC ने ताडपत्री आणि बांबूने झाकून पूर्णपणे बंद केला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, यामुळे कबुतरांना खाद्य मिळणे बंद झाले, परिणामी काही कबुतरे रस्त्यावर वाहनांच्या धडकेत किंवा उपासमारीने मृत्यूमुखी पडत असल्याचा दावा स्थानिक आणि जैन समाजाकडून केला जात आहे. जैन समाजाने या कारवाईला तीव्र विरोध दर्शवला आहे. रविवारी (3 ऑगस्ट) जैन समाजाच्या सदस्यांनी कोलाबा येथील जैन मंदिरापासून गेटवे ऑफ इंडियापर्यंत ‘शांतिदूत यात्रा’ काढून निषेध व्यक्त केला. कबुतरांना खाद्य देणे हा त्यांच्या अहिंसा आणि करुणा या धार्मिक मूल्यांचा भाग आहे. BMC च्या कारवाईमुळे हजारो कबुतरे उपासमारीने मरत असल्याचा आरोप जैन समाजाने केला आहे. कबुतरांसाठी पर्यायी व्यवस्था करता येईल : मंगलप्रभात लोढा राज्याचे कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कबुतरखान्यांना पर्यायी व्यवस्था दिल्याशिवाय बंदी घालू नये, अशी मागणी केली आहे. “कबुतरे नॉनव्हेज किंवा पडलेले अन्न खात नाहीत. त्यांना जगवणे ही आमची जबाबदारी आहे. लोकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे, पण बीकेसी, महालक्ष्मी रेसकोर्स, आरे कॉलनी किंवा कोस्टल रोडवरील उद्याने यांसारख्या कमी लोकवस्तीच्या ठिकाणी कबुतरांसाठी पर्यायी व्यवस्था करता येईल,” असं लोढा यांनी सांगितलं.