Terror Attack Plan Delhi : दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश.! दिल्ली पोलिसांकडून 4 दहशतवाद्यांना अटक; धार्मिकस्थळांची केली रेकी
दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचल्याप्रकरणी दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे.

Terror Attack Plan Delhi – दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचल्याप्रकरणी दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय नेटवर्कशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक केली आहे.
अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून तुर्की बनावटीच्या जिगाना पिस्तुलासह दोन विदेशी पिस्तूल, नऊ काडतुसे आणि पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे. शुभदीप सिंग ऊर्फ विशाल (२३), गुरजंत सिंग ऊर्फ ऋषी (२२), साजन सिंग ऊर्फ हनी (२८) आणि गगनप्रीत (२४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, ते सर्व पंजाबचे रहिवासी आहेत.
डीसीपी प्रवीण कुमार त्रिपाठी म्हणाले, पाकिस्तानस्थित आयएसआयचा हँडलर शहजाद भट्टी आपल्या साथीदारांसह दिल्ली एनसीआरमध्ये एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याची योजना आखत होता. यासाठी त्याने पंजाबमधील स्थानिक तरुणांना जाळ्यात ओढले होते.
प्राथमिक तपासानंतर, विशेष पथकाने भारतीय दंड संहिता आणि शस्त्र कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर, दिल्ली आणि पंजाबमधील अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. पंजाबमधील अमृतसर (मजिठा रोड) येथून शुभदीप सिंग उर्फ विशाल याला पहिली अटक करण्यात आली. (Terror Attack Plan Delhi)
त्याच्याकडून एक सेमी-ऑटोमॅटिक पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान, त्याने शहजाद भट्टी नेटवर्कच्या पाकिस्तानी सूत्रधारांच्या थेट संपर्कात असल्याची आणि ड्रोनद्वारे शस्त्रे व अमली पदार्थांची खेप स्वीकारत असल्याची कबुली दिली.
शुभदीपकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, त्याचे दोन साथीदार, गुरजंत सिंग उर्फ ऋषी आणि साजन सिंग उर्फ हनी यांना पंजाबमध्ये अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक जिगाना पिस्तूल आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली. पुढील कारवाईत पोलिसांनी गगनप्रीत नावाच्या चौथ्या दहशतवाद्याला दिल्लीतून अटक केली.
धार्मिकस्थळांची रेकी (Terror Attack Plan Delhi)
अटक केलेल्या आरोपींपैकी गगनप्रीतला त्याच्या पाकिस्तानी हँडलर्सकडून एक धोकादायक काम सोपवण्यात आले होते. त्याने दिल्लीतील पोलीस ठाणी, पोलीस चौक्या आणि प्रमुख धार्मिक स्थळांची टेहळणी करून याचे व्हिडिओ पाकिस्तानला पाठवले होते. दिल्लीतील एका ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करून दहशत पसरवण्याचे कामही त्याला देण्यात आले होते.





