Wimbledon Open 2024 : सर्बियाचा स्टार टेनिसपटू जोकोविचची आगेकूच कायम..! सिन्नेर, ज्वेरेवही विजयी…

Wimbledon Open 2024 :- सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोवीच याने पुरुष एकेरीत चेक प्रजासत्ताकच्या विट कोपरिवाला ६-१, ६-२, ६-२ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले व प्रतिष्टेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेतही आगेकूच कायम राखली. महिला एकेरीत अमेरिकेची जेसिका पेगुला व कोको गॉफ तसेच जपानची नाओमी ओसाका यांनी पुढच्या फेरीत आपले स्थान निश्चित केले. पुरुष एकेरीत इटलीच्या अग्रमानांकित यानिक सिन्नेर, नोव्हाक जोकोविच व अलेक्झांडर ज्वेरेवने दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले.
महिला एकेरीच्या सामन्यात सहावी मानांकित वोंड्रोउसोवा हिला स्पेनच्या युवा जेसिका मानेइरोने ६-४, ६-२ असं पराभूत करत सनसनाटी निकालाची नोंद केली. अन्य सामन्यांत, पाचव्या मानांकित पेगुलाने अमेरिकेच्या अश्लेन क्रुएगरला ६-२, ६-० असे पराभूत केले.
गॉफनेही कॅरोलिन डोलेहाइवर ६-१, ६-२ असा सरळ सेटमध्ये विजय नोंदवला. तर, ओसाकाने संघर्षपूर्ण लढतीत फ्रान्सच्या डिआने पेरीला ६-१, १-६, ६-४ असे नमवले. चौथ्या मानांकित कझाकस्तानच्या एलिना रायबाकिनाने रोमानियाच्या एलिना गॅब्रिएला रुसवर ६-३, ६-१ असा सरळ सेटमध्ये विजय नोंदवत पुढच्या फेरीत धडक मारली.
पुरुष एकेरीत सिन्नेरने जर्मनीच्या यानिक हाफमनला ६-३, ६-४, ३-६, ६-३ अशा फरकाने विजय नोंदवला. पहिले दोन सेट जिंकल्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये हाफमनने खेळ उंचावत पुनरागमन केले. चौथ्या सेटमध्ये सिन्नेर चमक दाखवत विजय सुनिश्चित केला. तर, पुरुष एकेरीत चौथ्या मानांकित जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवने स्पेनच्या रॉबर्टो कारबालेस बाएनावर ६-२, ६-४, ६-२ असा विजय मिळवला. सातव्या मानांकित पोलंडच्या हबर्ट हुरकाझने मोल्डोवाच्या राडू एल्बोटला ५-७, ६-४, ६-३, ६-४ असे नमवत पुढची फेरी गाठली.





