Novak DJokovic : मेलबर्नमध्ये अनुभवाचा विजय! ४ तासांच्या थरारात जोकोविच सिनरवर मात करत फायनलमध्ये दाखल
Novak DJokovic : टेनिस जगताचा सम्राट नोव्हाक जोकोविच याने यानिक सिनरचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.

Novak DJokovic reaches final in Australian Open 2026 : वर्षातील पहिला ग्रँड स्लॅम म्हणजेच ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यातील स्पर्धक निश्चित झाले आहेत. ३० जानेवारी रोजी झालेल्या अटीतटीच्या उपांत्य फेरीत टेनिस जगताचा सम्राट नोव्हाक जोकोविच याने यानिक सिनरचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता १ फेब्रुवारी रोजी विजेतेपदासाठी जोकोविचचा सामना युवा स्टार कार्लोस अल्काराझशी होणार आहे.
जोकोविच-सिनर यांच्यात रंगणार ५ सेटचा थरार
नोव्हाक जोकोविच आणि यानिक सिनर यांच्यातील दुसरा उपांत्य फेरीचा सामना तब्बल ४ तास चालला. या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी रक्ताचे पाणी करत एकमेकांना कडवी झुंज दिली. पहिल्या सेटमध्ये सिनरने ६-३ ने विजय मिळवत आघाडी घेतली. त्यानंतर जोकोविचने दुसऱ्या सेटमध्ये ६-३ ने पुनरागमन केले. तिसऱ्या सेटमध्ये पुन्हा सिनरने ६-४ ने बाजी मारत सामन्यावर पकड मिळवली.
जेव्हा सिनर २-१ ने आघाडीवर होता, तेव्हा ३८ वर्षीय जोकोविचने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर केला. त्याने चौथा सेट ६-४ ने जिंकून सामना २-२ अशा बरोबरीवर आणला. यानंतर पाचव्या आणि शेवटच्या सेटमध्ये जोकोविचने आपला आक्रमक खेळ कायम ठेवत ६-४ ने विजय मिळवला आणि ३-२ अशा फरकाने सामन्यासह अंतिम फेरीचे तिकीट पक्के केले.
#NovakDjokovic: “I’m lost for words right now, to be honest. It feels surreal.
“The quality of tennis was extremely high, and I knew that was the only way for me to have a chance tonight.
“I have tremendous respect for [Sinner]. Incredible player. He pushes you to the limits.” pic.twitter.com/TkvSY3Jm04
— LoveGameTennis 🎾 (@LoveGame_Tennis) January 30, 2026
बऱ्याच कालावधीनंतर जोकोविच फायनलमध्ये दाखल –
नोव्हाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या फायनलमध्ये दाखल
नोव्हाक जोकोविचसाठी हा विजय अत्यंत खास आहे. गेल्या चार ग्रँड स्लॅममध्ये त्याला उपांत्य फेरीचा अडथळा पार करता आला नव्हता. मात्र, पाचव्या प्रयत्नात त्याने हा ‘दुष्काळ’ संपवला असून आता तो आपल्या २४ व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
१ फेब्रुवारी: जोकोविच विरुद्ध अल्काराझ
दुसरीकडे, स्पेनच्या कार्लोस अल्काराझने पहिल्या उपांत्य फेरीत शानदार विजय मिळवत आधीच फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात ‘अनुभव विरुद्ध तारुण्य’ असा जबरदस्त सामना पाहायला मिळणार आहे. टेनिस चाहते या हाय-व्होल्टेज सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.





