Carlos Alcaraz : टेनिस विश्वात ‘अल्काराझ’ पर्व! जोकोविचचं २५ व्या जेतेपदाचं स्वप्न भंगलं; कार्लोसने पटकावलं ऐतिहासिक ‘करिअर ग्रँड स्लॅम’
Carlos Alcaraz : कार्लोस अल्काराझ करिअर स्लॅम पूर्ण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

Carlos Alcaraz won Australian Open 2026 Title : स्पेनच्या कार्लोस अल्काराझने नोव्हाक जोकोविचचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. मेलबर्न पार्क येथे झालेल्या या रोमांचक अंतिम सामन्यात विजय मिळवत त्याने कारकिर्दीतील सातवे ग्रँड स्लॅम पटकावले. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी ही ऐतिहासिक कामगिरी करणारा तो टेनिस इतिहासातील सर्वात तरुण ‘करिअर स्लॅम’ विजेता ठरला आहे.
जोकोविचचा मेलबर्नमधील पहिलाच पराभव!
तब्बल ३ तास आणि २ मिनिटे चाललेल्या या अटीतटीच्या सामन्यात कार्लोस अल्काराझने जोकोविचचा २-६, ६-२, ६-३, ७-५ असा चार सेटमध्ये पराभव केला. विशेष म्हणजे, जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत मिळालेला हा कारकिर्दीतील पहिलाच पराभव आहे. यापूर्वी जोकोविचने मेलबर्नमध्ये खेळलेले सर्व ११ अंतिम सामने जिंकले होते. जोकोविचचे २५ वे ग्रँड स्लॅम जिंकून इतिहास रचण्याचे स्वप्न अल्काराझने मोडीत काढले.
२२ व्या वर्षी ‘करिअर स्लॅम’चा जागतिक विक्रम –
कार्लोस अल्काराझने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी चारही मुख्य ग्रँड स्लॅम (ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि यूएस ओपन) जिंकण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. करिअर स्लॅम पूर्ण करणारा तो इतिहासातील सर्वात तरुण पुरुष खेळाडू आणि जगातील केवळ नववा टेनिसपटू ठरला आहे.
Another brilliant fortnight from our 10x champ 💫
It’s always a pleasure to have you in Melbourne, @DjokerNole 💙 pic.twitter.com/gSXFAFcBHh
— #AusOpen (@AustralianOpen) February 1, 2026
काय आहे ‘करिअर स्लॅम’?
कार्लोस अल्काराझ करिअर स्लॅम पूर्ण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला
जेव्हा एखादा खेळाडू आपल्या संपूर्ण कारकिर्दीत किमान एकदा तरी चारीही प्रमुख ग्रँड स्लॅम स्पर्धा (ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन आणि यूएस ओपन) जिंकतो, तेव्हा त्याला ‘करिअर स्लॅम’ विजेता म्हटले जाते.
कसा होता अंतिम सामन्याचा थरार?
सामन्याची सुरुवात जोकोविचने दमदार केली होती आणि पहिला सेट ६-२ ने खिशात घातला. मात्र, अल्काराझने हार न मानता दुसऱ्या सेटपासून आक्रमक पवित्रा घेतला. त्याने सलग दोन सेट ६-२, ६-३ ने जिंकून आघाडी घेतली. चौथ्या आणि निर्णायक सेटमध्ये जोकोविचने कडवी झुंज दिली, पण अल्काराझच्या वेगवान खेळापुढे त्याचा निभाव लागला नाही आणि अल्काराझने ७-५ ने सेट जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला.





